शिवसेना-भाजपमधील वाद विकोपाला, 50 कुठं आणि 105 कुठं? म्हणत भाजपची बॅनरबाजी
X
गेल्या काही दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारमधील धुसफूस समोर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच शिंदे गटाने भाजपला डिवचल्यानंतर आता भाजपनेही शिंदे गटाला डिवचत बॅनरबाजी केली आहे.
भाजपने महाराष्ट्रातील 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात आपले संपर्कप्रमुख नेमल्यानंतर शिवसेना विरुध्द भाजप यांच्यातील धुसफूस वाढली होती. त्यातच एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हे खासदार असलेल्या कल्याण मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यामुळे BJP आणि Shivsena यांच्यातील वाद पेटला असून श्रीकांत शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांची नाराजी वाढत असतानाच एकनाथ शिंदे यांनी वर्तमानपत्रांमध्ये एका सर्व्हेचा हवाला देत मुख्यमंत्री पदासाठी आपल्यालाच सर्वात जास्त पसंती असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांना डिवचले. मात्र त्यानंतर पडद्यामागे घडलेल्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांना पुन्हा दुसरी जाहिरात प्रसिध्द करावी लागली होती. मात्र यानंतर भाजप नेते अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटावर टीका केली होती. त्यावरून भाजप – शिवसेनेत आलबेल नसल्याचे समोर आले.
अनिल बोंडे यांनी प्रसिध्द झालेल्या जाहिरातीवरून म्हटले की, बेडकाने कितीही अंग फुगवले तरी तो हत्ती होत नाही. त्याबरोबरच ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही हे एकनाथ शिंदे यांनी लक्षात ठेवावे, असाही टोला अनिल बोंडे यांनी दिला होता. त्यानंतर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपवर निशाणा साधला.
50 आमदार वाघ आहेत. त्यामुळे भाजपला सत्ता मिळाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद आणि वाहवा पचवण्याची क्षमता भाजपच्या लोकांनी ठेवायला हवी, असं मत संजय गायकवाड यांनी व्यक्त केले. तसेच अनिल बोंडे ठाण्याविषयी बोलतात. पण त्यांनी लक्षात ठेवावं की ते कुणाच्या मदतीने महाराष्ट्रात आले. त्यामुळे भाजपने औकातीत रहावे, असाही टोला संजय गायकवाड यांनी लगावला.
त्यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये भाजपने बॅनरबाजी केली आहे. त्यावर लिहीले आहे की, 50 कुठं आणि 105 कुठं? हाच भाजपचा मोठेपणा. देवेंद्र फडणवीस सिर्फ नाम ही काफि है, असं म्हणत भाजपने एकनाथ शिंदे यांना डिवचलं आहे. तसेच या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावून किंग मेकर म्हटलं आहे. त्याबरोबरच या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा, पंकजा मुंडे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचे फोटो आहेत. हे बॅनर उल्हासनगरमधील मार्केट एरिया परिसरात लागल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरबाजीमुळे एकनाथ शिंदे आणि भाजपमधील संघर्ष तीव्र झाल्याचे म्हटले जात आहे.