चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना
Max Maharashtra | 7 Oct 2019 8:12 PM IST
X
X
भाजपकडे असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे महापालिका गटनेते राहुल कलाटे यांनी बंडोखोरी करून अपक्ष अर्ज दाखल केला आहे. मात्र, आज शेवटच्या दिवशीही कलाटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. त्यात राष्ट्रवादी उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने थेट आमदार लक्ष्मण जगताप विरूद्ध राहुल कलाटे असाच सामना रंगणार आहे.
२००९ मध्ये अपक्ष रिंगणात उतरलेले लक्ष्मण जगताप यांच्या बाजूने मतदारांनी कौल देत, त्यांना आमदाराच्या खुर्चीवर बसवले. त्यांनतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून भाजपची विचारसरणी आत्मसात केली. २०१४ मध्ये चारही प्रमुख पक्षांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवले. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांना १,२३,७८६ एवढे भरघोस मतदान करून पुन्हा संधी दिली. तर दुसऱ्यास्थानी असलेले शिवसेनेचे राहुल कलाटे यांना ६३,४८९ तर राष्ट्रवादीचे नाना काटे यांनी ४२,५५३ मतदारांनी पसंती दर्शवली होती.
मात्र, यावेळी राज्यात भाजप-शिवसेना आणि मित्र पक्षांची महायुती असताना शिवसेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केल्याने चिंचवड विधानसभेचा आखाडा रंगतदार होणार आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने बाद झाला. त्यामुळे राष्ट्रवादीने राहुल कलाटे यांना पुरस्कृत घोषित केल्यास जगताप यांच्यापुढे आव्हान निर्माण होऊ शकते.
परंतु, शहर राष्ट्रवादीत फुट पडून कलाटे यांच्याऐवजी आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मदत केल्यास जगताप यांचा एकेरी विजय होईल. यात मात्र शंका नाही. दरम्यान, आज कैलास परदेशी, जावेद शेख, धर्मपाल तंतरपाळे यांनी माघारी घेतली आहे.
तर बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लोंढे, जनहित लोकशाही पार्टीचे नितीश लोखंडे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रकाश घोडके, भारतीस राष्ट्रवादी पार्टीचे महावीर संचेती, भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या छायावती चंद्रकांत देसले यांच्यासह सुरज खंडारे, डॉ. मिलींदराजे भोसले, राजेंद्र काटे, रवींद्र पारधे हे जगताप आणि कलाटे यांचे स्पर्धक रिंगणात आहेत.
Updated : 7 Oct 2019 8:12 PM IST
Tags: bjp Chinchwad election Shivsena
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire