Home > News Update > राम मंदिर जमीन खरेदी घोटाळा, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची शिवसेनेची मागणी

राम मंदिर जमीन खरेदी घोटाळा, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची शिवसेनेची मागणी

राम मंदिर जमीन खरेदी घोटाळा, पंतप्रधानांनी हस्तक्षेप करण्याची शिवसेनेची मागणी
X

courtesy social media

अयोध्येत उभे राहत असलेल्या राम मंदिरासाठी जमीन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप झाला आहे. यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पण आता याप्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाममधून ही मागणी करण्यात आली आहे. सामनाच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे ते पाहूया....

प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर व्हावे ही तर जगभरातील तमाम हिंदूंचीच इच्छा आहे. त्या राममंदिरासाठी हिंदूंना मोठा लढा त्यांच्याच हिंदुस्थानात द्यावा लागला. अयोध्येच्या भूमीवर साधू, संत, करसेवकांनी रक्त सांडले. शरयू नदी हिंदूंच्या रक्ताने लाल झाली. बाबरीचे घुमट शिवसैनिकांनी तोडताच मुंबईसह देशातील अनेक भागांत दंगली उसळल्या. त्यातही असंख्य हिंदूंना प्राण गमवावे लागले. गुजरातमधील साबरमती एक्सप्रेसवर हल्ला झाला. ते पुढे 'गोध्राकांड' म्हणून इतिहासात नोंदले गेले. त्या गोध्राकांडानंतरही अयोध्येहून परतणाऱया असंख्य रामसेवकांचे मृत्यू झाले. मुंबईत 93 सालात भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवून धर्मांध पाकडय़ांनी शेकडो निरपराधांचे प्राण घेतले. हा अयोध्या लढय़ाचाच बदला होता. अशा असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे. राममंदिराची उभारणी व्हावी यासाठी केंद्र सरकारने एक 'न्यास' म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केली. राममंदिर निर्माणसंदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार हा 'न्यास'च करणार होता व या संस्थेतील सर्व लोक हे प्रखर हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी असल्याने कोणत्याही शंकेला जागा नाही, पण 'आप' पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. फक्त 10 मिनिटांपूर्वी दोन कोटींना घेतलेली जमीन राममंदिर निर्माण न्यासाने 18.5 कोटींना विकत घेतल्याचा स्फोट संजय सिंह यांनी केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे.

हे सर्व प्रकरण नक्की काय आहे? त्याविषयी संभ्रम आहे. तो संभ्रम दूर करण्याचे काम रामजन्मभूमीचे प्रमुख महासचिव चंपत राय यांनाच करावे लागेल. रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यावर जगभरातील कोटय़वधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले. शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम व त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळय़ाचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल.

Updated : 15 Jun 2021 8:36 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top