ईडीची पिडा टाळण्यासाठी शिवसेनेची भाजपाला मदत?
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणूकीतून शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतली आहे.
X
मुंबई// राज्यात भाजपा आणि महाविकास आघाडीचे कायम भांड्याला भांडे लागून आहे. त्यात सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी भाजपाकडून सोडली जात नाही. मात्र मुंबईत भाजपाच्या उमेदवारासाठी शिवसेनेने माघार घेतली आहे.मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणूकीचे बिगूल वाजले आहे. त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपासोबत नवे समीकरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणूकीतून शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांनी माघार घेतली आहे.बँकींग गट आणि मजूर संस्था गटातून निवडणूक अर्ज दाखल केलेल्या दरेकरांच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे मजूर संस्था गटातून प्रविण दरेकरांची उमेदवारी धोक्यात आली होती. त्यावरून चांगलेच
राजकारण रंगले होते. तर सहकार विभागानेही प्रविण दरेकर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. त्यामुळे मजूर गटातून प्रविण दरेकर आपला अर्ज मागे घेतील.
पण, नागरी बँक गटात भाजपा नेते प्रविण दरेकर यांच्या विरोधात शिवसेनेचे अभिजीत अडसुळ हे निवडणूक लढवणार होते. मात्र त्यांनी ऐनवेळी निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे प्रविण दरेकरांना मदत म्हणून निवडणूकीतून माघार घेतली की, ईडीचा ससेमिरा मिटवण्यासाठी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शिवसेना नेते खासदार आनंदराव आडसुळ यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. तर अभिजीत आडसुळ हे आनंदराव आडसुळ यांचे पुत्र आहेत. त्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत भाजपाला मदत करून ईडीची पिडा सोडवण्याचा प्रयत्न अभिजीत आडसुळ यांनी केला आहे का? अशी चर्चा सुरू आहे.