जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाबाबत शिवसेनेचं तळ्यात-मळ्यात?
X
रत्नागिरी - जैतापूर प्रकल्पाला केंद्र सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. तरी स्थानिकांचे मत विचारात घेतल्याशिवाय आम्ही भूमिका ठरवणार नाही, असे मत शिवसेना नेते आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे, तसेच स्थानिकांच्या विरोधात जाऊन शिवसेना भूमिका घेणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ते रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला चालना देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे, मात्र जैतापुर प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणाला काय मिळणार आणि स्थानिकांची भूमिका काय आहे याची माहिती स्थानिक आमदार, खासदार समजून घेतील, तसेच त्यानंतरच शिवसेनेची भूमिका ठरेल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
जैतापुर अणूऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने सुरूवातीपासूनच विरोध केला होता. पण आता केंद्र सरकारने या प्रकल्पाला तत्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुन्हा स्थानिकांशी चर्चा करून शिवसेनेची भूमिका ठरवली जाईल. तसेच शिवसेना स्थानिकांच्या पाठीशी असेल, असे सामंत यांनी सांगितले.
दरम्यान TET परीक्षांमधील गैरप्रकाराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचे धाडस करणारा कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा अधिकाऱ्यांना तुरूंगात टाकले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर भाजपाचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.