Home > News Update > आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही: संजय राऊतांचा पलटवार

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही: संजय राऊतांचा पलटवार

आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही: संजय राऊतांचा पलटवार
X

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईविरोधात अनेक प्रतिक्रीया येत असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. "आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. हिंमत असेल तर घरी या आणि अटक करा," असं जाहीर आव्हान संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

"काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे," असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. "ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याचंसारखं काम करु नये," असंही ते म्हणाले आहेत.

"आमच्या सर्व आमदार आणि खासदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालय थाटलं तरी आम्ही घाबरत नाही," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. "ईडी असो किंवा कोणीही असो त्यांनी राजकीय पक्षाची शाखा असल्याचंसारखं काम करु नये," अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

"ज्यांचे आदेश ते पाळत आहेत त्यांच्या १०० लोकांची यादी मी पाठवून देतो. त्यांचे काय धंदे, उद्योग आहेत, मनी लॉण्ड्रिंग कशा पद्धतीने चालतं, निवडणुकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, बेनामी काय आहे वैगेरे याची कल्पना ईडीला नसली तरी आम्हाला आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा, न्यायव्यवस्था, कायदा हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम, चाकर आणि नोकर असल्यासारखं वागत असतील तर आम्ही पर्वा करत नाही. तुम्ही कितीही नोटीसी पाठवा, धाडी टाका, खोटी कागदपत्रं सादर करा पण विजय शेवटी सत्याचाच होईल. फक्त महाराष्ट्रातच सत्यमेव जयतेचा विजय होऊ शकतो," असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.


Updated : 24 Nov 2020 2:06 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top