Home > News Update > शिवसेना आमदार अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकणार ?

शिवसेना आमदार अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकणार ?

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सामना रंगला आहे. त्यातच विकासकामांसाठी पुरेसा निधी मिळत नसल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करत असतो. पण सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच निधी मिळत नसल्याची तक्रार करत अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेना आमदार अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकणार ?
X

विरोधी पक्षाला पुरेसा निधी मिळत नसल्याचा आणि विरोधी पक्षाच्या आमदारांवर अन्याय होत असल्याचे म्हटले जाते. त्यातुलनेत सत्ताधारी आमदारांना सत्तेचा वापर करून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असतो. मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेच्या आमदारांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

शिवसेनेच्या 25 आमदारांनी निधी वाटपात शिवसेनेच्या आमदारांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत स्वपक्षाविरोधातच दंड थोपटले आहेत. तर शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत निधी वाटपात शिवसेनेवर प्रचंड अन्याय होत असल्याची भुमिका शिवसेना आमदारांनी मांडली. तसेच निधी मिळाला नाही तर अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवसेनेच्या 25 आमदारांनी दिला होता.

शिवसेनेचे आमदार भरत गोगावले, प्रकाश आंबिटकर, आशिष जयस्वाल, वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन निधी वाटपात होत असलेल्या अन्यायाची तक्रार केली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना बोलावून घेत शिवसेना आमदारांच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यास सांगितले.

यावेळी शिवसेना आमदार म्हणाले की, काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघासाठी 900 कोटी, राष्ट्रवादीच्या आमदारांसाठी 700 कोटी तर शिवसेनेच्या आमदारांसाठी फक्त 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे अर्थसंकल्पातच जर अन्याय होणार असेल तर आम्ही सभागृहात का बसायचं, त्यापेक्षा आम्ही लॉबीत किंवा विधासभेच्या बाहेर पायऱ्यावर बसू असा इशारा शिवसेनेच्या आमदारांनी दिला आहे.

शिवसेना आमदारांनी अर्थसंकल्पावर बहिष्कार टाकण्याच्या तक्रारीची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून तातडीने दखल घेतली आहे. तर तक्रारीची सोडवणूक केली जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.


Updated : 8 March 2022 9:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top