Home > News Update > शिंदेनी एका दगडात दोन पक्षी मारले हेमंत पाटलांसह भावना गवळींचाही पत्ता कट...!

शिंदेनी एका दगडात दोन पक्षी मारले हेमंत पाटलांसह भावना गवळींचाही पत्ता कट...!

शिंदेनी एका दगडात दोन पक्षी मारले   हेमंत पाटलांसह भावना गवळींचाही पत्ता कट...!
X

हिंगोली आणि यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून भाजपच्या दबावामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. यापूर्वी शिवसेनेकडून जाहिर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये हिंगोली मतदारसंघात खासदार हेमंत पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, मात्र त्यामुळे मतदारसंघात भाजपकडून कमालीचा रोष निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना नाईलाजाने हेमंत पाटील यांचा पत्ता कट करावा लागला. हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून त्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना हिंगोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर हेमंत पाटील यांचा पत्ता कट झाल्यानंतर मात्र त्यांच्या पत्नी राजश्री पाटलांना यांना यवतमाळ- वाशीम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देत तिथे विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून एका दगडात दोन पक्षी शिंदे यांनी मारले आहे.

इतकी मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हेमंत पाटील यांच्याशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेणार नाहीत.

भावना गवळींचा पत्ता कट :

यवतमाळ- वाशिम मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी भावना गवळी यांनी सर्वस्व पणाला लावले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली होती. फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याअगोदर भावना गवळी खूपच उत्साहात होत्या पणअर्ध्या तासाच्या भेटीनंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पार मावळला होता. भावना गवळी यांनी आपली गाडी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणात बोलावून घेतली आणि तिथूनच त्या गाडीत बसून माध्यमांशी संवाद न साधता निघून गेल्या होत्या. तेव्हापासूनच यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेने जोर धरला होता.

हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलण्यामागे भाजप कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी यवतमाळ-वाशीममधून मतदारसंघातून भावना गवळी यांच्या जागी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या आमदार राजू पारवे यांना तिकीट देण्यात आलं. आता हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांना भाजपचा वाढता विरोध पाहून त्यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने यांना उमेदवारी देण्याची शकता आहे.

दुसरीकडे नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे उमेदवारी मिळविण्यासाठी जंग जंग पछाडत आहेत पण भाजप विरोधामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक आहे. अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा वायव्य मुंबईमधून शिवसेनेचे संभावित उमेदवार असण्याची शक्यता वर्तविली जातेय कारण विद्यमान खासदार गजानन किर्तीकर याणी निवडणूक लढवण्यास नकार दिलाय. या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून अमोल गजानन कीर्तिकर यांना तिकीट जाहीर झाले आहे.

Updated : 3 April 2024 10:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top