तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबियांची साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकास भेट
मुंबईवर 26/11 रोजी झालेल्या हल्ल्यात प्राणाचीही पर्वा न करता आतंकवादी असलेल्या अजमल कसाबला जीवंत पकडणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबियांनी साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकास भेट दिली.
X
मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या तुकाराम ओंबळे यांच्या कुटूंबियांनी सातारा जिल्ह्यातील माणगाव येथील राष्ट्रीय स्मारकास भेट दिली. यावेळी शहीद तुकाराम ओंबळे यांचे सातारा जिल्ह्यातील केडांबे या गावी स्मारक बनवण्याचा मानस ओंबळे कुटूंबियांनी व्यक्त केला.
शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली, चुलत बंधू आदिनाथ ओंबळे, तसेच शिवसेनेचे जावळी सातारा विधानसभा संपर्कप्रमुख व चुलत बंधू एकनाथ ओंबळे हे त्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्याबरोबरच हा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. तर त्याला साचेबद्ध किंवा नाममात्र स्वरुपात स्मारक बनवण्याची आपली मानसिक तयारी नाही. त्यामुळे आधी साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक बघावं, असं मत त्यांच्या कन्या वैशाली यांनी व्यक्त केलं.
साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकाला भेट दिल्यानंतर कितीतरी कल्पना स्पष्ट झाल्या. केवळ पुतळा उभा करायचाच नाही हे स्पष्ट होतं. पण नक्की करायचं काय? हे इथं आल्यानंतर स्पष्ट झालं आहे, असे मत वैशाली ओंबळे यांनी व्यक्त केले.
साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक हे महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाचे केंद्र बनले आहे. त्यामुळे आम्हाला ही वास्तू आवडल्याची प्रतिक्रीया तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली यांनी दिली. तसेच शहीद तुकाराम ओंबळे यांचे ही नव्याने उभे राहणारे स्मारक महाराष्ट्राच्या लढाऊ आणि शौर्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला साजेस असेल, असे साने गुरूजी राष्ट्रीय स्मारक माणगावचे व्यवस्थापक पद्माकर मीना यांनी सांगितले.