Home > News Update > वेश्या वस्तीतील आंबेडकर जयंती…

वेश्या वस्तीतील आंबेडकर जयंती…

मिरज शहरातील वेश्या भीम जयंती मोठ्या दिमाखात साजरी करतात. तुम्हाला हे माहिती आहे का? भीम जयंती साजरी करण्यामागे या महिलांचा नक्की उद्देश काय? वाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट वेश्या वस्तीतील आंबेडकर जयंती…

वेश्या वस्तीतील आंबेडकर जयंती…
X

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यांनी देशासाठी केलेल्या कार्याचे यावेळी स्मरण केले जाते. उपेक्षित समाजासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. जगभरात उपेक्षित समुहांकडून त्यांना मानवंदना दिली जाते. सांगली जिल्ह्यातील उत्तम नगर येथील वेश्या वस्तीत जयंती साजरी करून बाबासाहेबांना मानवंदना दिली जाते. जयंती साजरी केली जाते.

वेश्या कार्य करणाऱ्या महिला या केवळ उपेक्षित नाहीत. तर त्या उपेक्षितांमधील उपेक्षित आहेत. मिरज शहरातील उत्तम नगर येथे वेश्या वस्तीतील महिलांचे पूर्वी आर्थिक शोषण व्हायचे. त्यांना गुंड त्रास द्यायचे. दादागिरी करायचे. हफ्ते वसूल करायचे. चक्रवाढ दराने सावकारी सुरू असायची. महिला पोलिसांत जायच्या पण त्यांना दाद दिली जात नव्हती. पोलिस दखल घ्यायचे नाहीत. महिला असह्य होत होत्या. त्यांच्यावर होणारा अन्याय निमुटपणे सहन करत होत्या.

त्या संग्राम संस्थेच्या माध्यमातून मीना सेशू यांच्या नेतृत्वात एकत्र आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्काच्या जोरावर त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. संघटित झाल्याने त्यांना पोलिसांमध्ये दाद मिळू लागली. त्या वस्तीतील सावकारी कमी झाली. आर्थिक शोषण संपुष्टात आले. या सर्वाचे श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना जाते. या भावनेतून त्यांची जयंती करावी, आपणही त्यांच्या फोटोला पुतळ्याला हार घालावा असा विचार त्यांच्या मनात आला. यातून जयंती साजरी करण्याचा त्यांचा नवा संघर्ष सुरू झाला.




वेश्या काम करणाऱ्या महिलांनी जयंती करावी? ही गोष्ट काही लोकांना अज्ञानातून खटकली. आणि या जयंतीला काही प्रमाणात विरोध झाला. वेश्या काम करणाऱ्या मीनाक्षी त्यांचा हा अनुभव सांगतात… पूर्वी आम्ही संघटीत नव्हतो. महिलांचे आर्थिक शोषण व्हायचे. सावकारी मोठ्या प्रमाणात पसरलेली होती. गुंड येऊन दादागिरी करायचे. ते आले की आम्ही घरात पळून जायचो. मीना सेशू यांच्या मार्गदर्शनात आम्ही संग्राम संस्थेच्या माध्यमातून संघटीत झालो आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्काच्या जोरावर आम्ही या अन्यायाची दाद पोलिसात मागायला लागलो.

संघटीत झाल्यावर आम्हाला न्याय मिळाला. या सर्वाचे श्रेय बाबासाहेबांचे आहे. म्हणून आम्हाला बाबासाहेबांची जयंती करावी वाटत होती. आपणही त्यांच्या फोटोला हार घालावा असे वाटत होते.




परंतु त्या भागात होणाऱ्या जयंतीमध्ये सहभागी होऊ दिले जात नव्हते. हेच काम करणाऱ्या रेणुका सांगतात की, जयंतीसाठी आमच्याकडे वर्गणी मागायला लोक यायचे. आम्ही वर्गणी द्यायचो. पण आम्हाला मुख्य कार्यक्रमात सहभागी होऊ दिलं जात नव्हतं. जयंतीची मिरवणूक निघाली की आम्ही लांबून बघायचो त्यावेळी मनात विचार यायचा. आपण हार घ्यावा आणि मिरवणुकीत मांडलेल्या फोटोला घालावा. त्यांना अभिवादन करावे. परंतु ते शक्य होत नव्हतं. लांब उभा राहिले तरी कुणी तरी येऊन तिकडे जा म्हणून हटकत असायचं. म्हणून आम्ही ठरवलं बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिलेत. ज्याच्या जीवावर आपण भांडतोय. आपणही जयंती साजरी करायची.

भारती सांगतात आम्ही ठरवलं जयंती करायचीच. कमिटी करण्यात आली. यात सर्व महिलाच होत्या. नियोजन केले. वर्गणी काढायची ठरलं. वस्तीतील बहुसंख्य वेश्या काम करणाऱ्या महिलांची हीच भावना होती. त्यांना जयंतीमध्ये सहभागी व्हायचे होते. यानंतर २००६ या वर्षी महिलांनी आपली ही भावना संग्राम संस्थेच्या संस्थापक मीनाक्षी सेशू यांच्याकडे बोलून दाखवली. त्यांनीदेखील तुम्ही करणार असाल तर मी मदत करायला तयार आहे असे सांगितले.

महिलांनी जयंती कमिटी बनवली. नियोजन बैठक घेतली. कुणी तीनशे रुपये दिले. कुणी चारशे रुपये दिले. सर्व महिला कामाला लागल्या. उत्तम नगरमधील ही गल्ली चकाचक झाली. प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या गेल्या. पंचवीस फुटाचा आकर्षक मंडप उभा राहिला. रस्त्यारस्त्यावर निळ्या पताका फडकू लागल्या. स्टेज उभे राहिले. परिसरात निळे झेंडे फडकू लागले. लाऊड स्पीकर वर बाबासाहेबांची गाणी वाजु लागली.

चौदा एप्रिल या दिवशी महिलांनी रॅली काढत, हातात निळे झेंडे फडकावत संघटनेचा बोर्ड धरून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेल्या. अभिवादन केले. शुभ्र वस्त्रात निळे झेंडे घेऊन सामूहिक आलेल्या महिलांकडे पाहून शहर अवाक झाले. या महिला कुठल्या ? कुठून आल्या? असे प्रश्न अनेकांना पडले. महिलांच्या संघटनेची ताकत संपूर्ण शहराला त्या दिवशी दिसली. सायंकाळी स्टेजवर कार्यक्रम झाला. वस्त्यांमध्ये मेणबत्त्या प्रज्वलित झाल्या. गोडधोड जेवण करण्यात आले.

या दरम्यान या महिलांना काही लोकांनी जयंती करताना विरोध देखील केल्याच त्या सांगतात त्यांना शिवीगाळ केली गेली. वाद निर्माण करण्यासाठी काहीही कारणे काढली. भांडणं काढले गेले. पण त्या जुमानल्या नाहीत. २००६ च्या त्या दिवसापासून उत्तम नगर येथील या गल्लीत जयंतीची परंपरा सुरू झाली. ती या लॉकडाऊन पर्यंत अविरत सुरू होती. पहिली दोन वर्षे वाद झाले. संघर्ष झाला. पण महिलांच्या संघटनेमुळे हळू हळू विरोध मावळला.

विरोध करणारी मंडळी देखील यानंतर कार्यक्रमात सहभागी होऊ लागली. या कार्यक्रमास राज्यातील सात जिल्ह्यातील महिला येतात. सायंकाळी वैचारिक कार्यक्रम होतो. वस्तीतील मुलांचे कार्यक्रम होतात. सामूहिक भोजन केले जाते. बेळगाव निपाणी कोल्हापूर इचलकरंजी येथील महिला देखील सहभागी होतात. वस्ती मध्ये जयंती करण्याचे अनेक वर्षांचे स्वप्न या महिलांनी अशा प्रकारे संघर्षातून साकार केले. त्यांनी केलेल्या संघर्षातून वस्तीमध्ये जयंतीची परंपरा सुरू झाली याबद्दल या महिलांना अभिमान वाटत आहे. यावर्षी लॉक डाऊन असल्याने सामूहिक जयंती करता येणार नसल्याचे दुःख या महिलांना आहे. यावर्षी घरीच फोटोला अभिवादन करून घरगुती स्वरूपात जयंती साजरी केली जाणार आहे.

उपेक्षितांमधील उपेक्षित असलेल्या या समुहामध्ये बाबासाहेबांच्या प्रति असलेला हा सन्मान लाख मोलाचा आहे. दररोज स्ट्रीट लाईट च्या प्रकाशात प्रकाशमान होणारी वस्ती दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी शुभ्र मेणबत्तीच्या स्वयंप्रकाशाने प्रकाशमान झालेली दिसते. हा स्वयंप्रकाश या महिलांच्या येत्या पिढ्यांना निश्चित प्रकाशमान करेल.

Updated : 28 April 2021 11:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top