Home > News Update > अदर पुनावाला यांचे वादावर स्पष्टीकरण, लस निर्मितीबाबत दिली मोठी माहिती

अदर पुनावाला यांचे वादावर स्पष्टीकरण, लस निर्मितीबाबत दिली मोठी माहिती

गेल्या काही दिवसांपासून वादात असलेले अदर पुनावाला यांनी आता सर्व वादावर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच लसींच्या निर्मितीच्या स्थितीचीही माहिती जाहीर केली आहे.

अदर पुनावाला यांचे वादावर स्पष्टीकरण, लस निर्मितीबाबत दिली मोठी माहिती
X

कोरोना विरोधातल्या भारताच्या लढाईत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूचे सीईओ अदर पुनावाला सध्या एका वादात अडकले आहेत. पुनावाला यांनी ब्रिटनमधील द टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्यावर भारतात लसींच्या पुरवठ्यासाठी काही जण दबाव टाकत असल्याचा गौप्यस्फोट केला होता. यानंतर सिरमच्या कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्याबाबत वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पण आता या चर्चेला अदर पुनावाला यांनी उत्तर दिले आहे. पुनावाला यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रकात त्यांनी लसीची निर्मिती, केंद्र सरकारशी वाद असल्याच्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

"माझ्या काही वक्तव्यांचा विपर्यास केला गेला आहे, त्यामुळे काही गोष्टींबाबत मला स्पष्टीकरण द्यायचे आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करु इच्छितो की लस निर्मिती ही एक विशेष प्रक्रिया आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे एका रात्रीमधून लसींचे उत्पादन वाढवता येत नाही. आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भारताची लोकसंख्या प्रचंड आहे आणि यातील प्रौढ लोकांसाठी पुरेसे डोस तयार करणे सोपे काम नाही. भारतापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या विकसित देशांना आणि बड्या कंपन्यांनाही अडचणी येत आहेत. गेल्या एप्रिलपासून आम्ही भारत सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला केंद्र सरकारकडून वैज्ञानिक, कायदेविषयक आणि आर्थिक पातळीवर पूर्ण सहकार्य मिळाले आहे," असेही पुनावाला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. "आतापर्यंत आम्हाला २६ कोटींपेक्षा जास्त डोसेसच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस आम्ही आतापर्यंत पुरवले आहेत. त्याचबरोबर पुढच्या आणखी ११ कोटी डोसेससाठी आम्हाला १०० टक्के एडव्हान्सदेखी मिळाला आहे. त्यामुळे आम्ही लवकरच विविध राज्यं आणि खासगी हॉस्पिटल्सना डोस पुरवले जाणार आहेत. प्रत्येकाला तातडीने लस मिळावी असे वाटणे स्वाभाविक आहे, आम्ही ते समजूसुद्धा शकतो. त्यासाठी आमचे प्रयत्नसुद्धा सुरू आहेत. आम्ही आणखी कष्ट करुन भारताचा करोनाविरुद्धचा लढा आणखी सक्षमपणे लढू," असं त्यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

Updated : 3 May 2021 9:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top