उद्योजक भोगले मारहाण प्रकरणाला वेगळे वळण ; जातीवाचक शिवीगाळ केल्याचा भोगलेंवर आरोप
उद्योजक भोगले मारहाण प्रकरणाला वेगळे वळण मिळालं असून त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांना मारहाण करण्यात आल्याचे निवेदन आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीने दिले आहे.
X
औरंगाबाद शहरातील एमआयडीसी परिसरामध्ये भोगले कंपनीमध्ये जाऊन, कंपनीच्या मालकाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याची दखल उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी घेत , त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांना संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक देखील केली आहे.
दरम्यान संबंधित कंपनी मालकाने जातीवाचक शिवीगाळ केल्याने कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचे आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीने म्हटलं आहे. याबाबत पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. याबाबत सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनेची शहानिशा न करता गुन्हा दाखल केल्याचे या निवेदनात म्हटलं आहे,
आम्हाला कोणी जातीवाचक शिवीगाळ करत असेल तर आम्ही त्याला त्याची जागा दाखवू असे यावेळी त्यांनी आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीने म्हटले आहे, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनी मालकावर आणि व्यवस्थापन यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समितीने केली आहे.
हे निवेदन जिल्हाधिकारी औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनाही पाठवण्यात आले आहे. 15 ऑगस्टपर्यंत कारवाई न केल्यास भडकळ गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.