फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा पालकांचा गंभीर आरोप
गेल्या काही दिवसात फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसू दिले नसल्याची, पालकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच सांगली जिल्ह्यातील विटा येथे विद्यार्थ्यांनी परीक्षा फी न भरल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.
X
एखादा रुग्ण दगावल्यानंतर त्याचे बील भरल्याशिवाय मृतदेह न देण्याचे धक्कादायक प्रकार घडत असतात. त्यातच शाळेची फी न भरल्यामुळे चक्क विद्यार्थ्यांना परीक्षेलाच न बसू दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सांगली जिल्ह्यातील विटा येथील इंग्लिश मेडियम स्कुलमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा फी न भरल्यामुळे त्यांना परीक्षेला बसू दिले नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर याबाबत शाळेचे मुख्याध्यापक अजय लांडगे यांच्याशी संपर्क केला असता असा प्रकार आमच्या शाळेत घडला नसल्याचे सांगितले. मात्र पालकांनी विद्यार्थ्यांची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हॉट्सअप गृपमधून काढून टाकल्याचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत. तर याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे.
पालकांनी सांगितले की, याबाबत आम्ही वरिष्ठ व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र त्यांनीही या प्रकरणाची दखल न घेतल्याची माहिती पालकांनी दिली. तर मुख्याध्यापकांनी सांगितले की, शाळा दोन सत्रात भरते. त्यामुळे वर्गात जागा नसते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राहिल्या आहेत. त्या परीक्षा दुसऱ्या स्लॉटमध्ये घेण्यात येतील, असे सांगितले. मात्र ज्या विद्यार्थ्यांची फी बाकी आहे तेच विद्यार्थी दुसऱ्या स्लॉटमध्ये कसे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.