Home > News Update > जेष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

जेष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन

बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि शिवसेनेच्या जडणघडणीत महत्वाची भुमिका बजावलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.

जेष्ठ शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन
X

सुधीर जोशी हे शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्याशी निष्ठा बाळगून होते. पुढे 1968 साली सुधीर जोशी मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडूण आले. त्यानंतर त्यांच्यावर पक्ष संघटनाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी सुधीर जोशी यांनी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर त्यांना 1972-73 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेचे दुसरे महापौर होण्याचा मान मिळाला. त्यानंतर त्यांच्या यशाचा आलेख उंचावतच राहिला.

सुधीर जोशी यांची सुशिक्षितांचे नेते म्हणून ओळख होती. तर त्यांनी पदवीधरांचे विधानपरिषदेत नेतृत्व केले होते. त्याबरोबरच शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून सुधीर जोशी यांना ओळखले जात होते. म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी 1992-93 च्या काळात विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी संधी दिली. त्यावेळी त्यांनी राज्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पाची पाहणी करून त्यासंदर्भातील निष्कर्ष अहवाल राज्य शासनाकडे सादर केला होता. तर पुढे सुधीर जोशी यांना युती सरकारच्या काळात महसूल मंत्री व शिक्षणमंत्री म्हणून पदभार संभाळला. त्याकाळात सुधीर जोशी यांनी लोकाभिमुख निर्णयातून आपल्या कामाची चुणूक दाखवली होती.

मात्र 1999 साली सुधीर जोशी यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ते सार्वजनिक जीवनातही सक्रीय असल्याचे दिसून येत नव्हते. त्यातच गेल्या काही दिवसांपुर्वी सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू गुरूवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सुधीर जोशी यांना राजकीय नेत्यांकडून श्रध्दांजली-

ज्येष्ठ शिवसेना नेते श्री सुधीर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. शिवसेनेला जनमानसात पोचवण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. मराठी माणसाच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या मार्गदर्शनाची कायमच उणीव भासेल, त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली, अशा शब्दात शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई यांनी सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रध्दांजली वाहिली. तर शरद पवार ट्वीट करून म्हणाले की, शिवसेना पक्ष संघटनेच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन दुःखद आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करताना अनेक लोकाभिमुख निर्णय त्यांनी घेतले होते. मराठी माणसाच्या हक्कासाठी कायम भूमिका मांडणाऱ्या सुधीर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, मुंबईचे माजी महापौर, राज्याचे माजी मंत्री श्री सुधीर जोशी जी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे.

कामगार आणि ग्राहक चळवळीत त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोलाचे होते. ते कायम स्मरणात राहील.

तसेच देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेल्या निष्ठावान सहकार्‍यांपैकी ते एक खंदे नेते. वाचनालयासारख्या चळवळीत सुद्धा त्यांनी काम केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

ॐ शान्ति

Updated : 17 Feb 2022 1:54 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top