Home > News Update > महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा बुलंद आवाज शांत झाला:केशवराव धोंडगे यांचे निधन

महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा बुलंद आवाज शांत झाला:केशवराव धोंडगे यांचे निधन

गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला 'मन्याडचा वाघ' विधिमंडळातील बुलंद तोफ सर्वात ज्येष्ठ 102 वर्षाचे आमदार शेकापचे केशवराव धोंडगे यांचे आज निधन झाले.

महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा बुलंद आवाज शांत झाला:केशवराव धोंडगे यांचे निधन
X

wडॉ. भाई केशवराव धोंडगे यांचे वयाच्या 102 व्या वर्षी एक जानेवारी रोजी रविवारी दुपारी 1:20 वाजता उपचार दरम्यान औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, पाच मुली, जावई, सुना, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. शेतकरी कामगार पक्षाचा पताका आयुष्यभर घेऊन जगलेले भाई केशव धोंडगे हे विधिमंडळातील मुलुख मैदानी तोफ होते. भाई धोंडगे यांची सभागृह दणाणून सोडणारी होती.

डॉ. केशवराव धोंडगे शेकाप मध्ये आयुष्यभर कार्य केले. ते शेवट पर्यंत पक्षाशी एकनिष्ठ राहिले. भाई धोंडगे 1967 ते 1995 पर्यंत कंधार विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले. तर 1977 ते 80 या कालावधीत खासदार म्हणून नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. ते महाराष्ट्र लोकलेखा समितीचे पाच वर्षे चेअरमन म्हणून काम पाहिले. 1949 मध्ये कंधार येथे श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे स्थापना करून ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, गोरगरिबांच्या मुलांसाठी 57 शाळा, एक विधी महाविद्यालय, दोन महाविद्यालय स्थापन करून शिक्षणाची सोय केली.

भाई धोंडगे यांनी 1975 साली आणीबाणीच्या विरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनात त्यांनी नाशिक जेल मध्ये 14 महिने कारावास भोगला. सीमा प्रश्नविषयी 1958 ला मालकी जेल (कर्नाटक) मध्ये दीड महिना जेल भोगली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात निजाम राजवटीच्या विरुद्ध काम केल्याने शासनाच्यावतीने त्यांना स्वतंत्र सैनिक म्हणून गौरवन्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव नांदेडच्या विद्यापीठाला देण्यासाठी भाई धोंडगेचा आग्रह होता.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ती मागणी मान्यही केली. भाई धोंडगे यांनी गोरगरिबांच्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अनेक सत्याग्रह केली. गुराख्याना पेन्शन मिळालेच पाहिजे हा त्यांचा नारा होता. उपेक्षित, नाहिरेवाल्यांची,

पोतराजांची मुले वकील झाली पाहिजेत यासाठी कंधारमध्ये त्यांनी विधी महाविद्यालय स्थापन करून मातोश्री मुक्तईचे स्वप्न साकार केले.

भाई धोंडगे हे जेष्ठ पत्रकार, साहित्यिक संपादक होते. साप्ताहिक जयक्रांतीच्या माध्यमातुन त्यांनी अनेक ज्वलंत प्रशांना वाचा फोडल्या. म्हणून 2012 साली त्यांना जेष्ठ संपादक म्हणून बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाने त्यांना डि.लीट पदवी बहाल करण्यात आली. शतकोत्सवी वर्षानिमित्त भाई कार्याची दखल घेऊन अमरावती विद्यापीठाने त्यांना डि.लीट पदवी बहाल करण्यात आली. शतकोत्सवी वर्षानिमित्त भाई धोंडगे यांचा राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने आणि विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहाच्यावतीने 24 ऑगस्ट 22 रोजी त्यांचा गौरव करण्यात आला.

2 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 2 वाजे पर्यंत त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी हायस्कुल पानभोसी रोड कंधार येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांची अंत्ययात्रा शहरातील मुख्य रस्त्याने निघणार असून दुपारी 4:15 वाजता क्रांतिभुवन बहाद्दरपुरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

"शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे साहेबांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणातला एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारं, विधीमंडळात जोरदार आवाज उठवणारं निर्भिड नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला 'मन्याडचा वाघ' हरपला आहे. मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाला आहे. देशाचा स्वातंत्र्यलढा, हैदराबाद मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, आणिबाणीविरुद्धचा लढा लढणाऱ्या केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन संघर्षशील होतं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन हजारो मोर्चे, सत्याग्रहं, आंदोलनं केली. त्यांचं एकशेदोन वर्षांचं जीवन दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या कल्याणासाठी समर्पित होतं. विधीमंडळातीन भाषणांनी महाराष्ट्र दणाणून सोडण्याची त्यांची ताकद होती. त्यांच्यासारख्या नेतृत्वाचं निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, वंचितांच्या हक्काच्या चळवळीची मोठी हानी आहे. केशवराव धोंडगे साहेबांचं जीवन हे राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील, " अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.

Updated : 1 Jan 2023 6:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top