रेल्वेच्या सवलतींपासून ज्येष्ठ नागरिक वंचित; 4 कोटी ज्येष्ठ नागरिकांकडून पूर्ण भाड्याची वसुली
X
नवी दिल्ली : कोरोना काळात 2020 पासून रेल्वेने आपल्या सर्व योजना रद्द केल्या होत्या. या निर्णयाचा मोठा फटाक हा ज्येष्ठ नागरिकांना बसल्याचं समोर आलं आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र, कोरोना काळात या सर्व सवलती बंद केल्याने वृद्धाना रेल्वेने प्रवास करताना पूर्ण भाडे द्यावे लागले. या काळात सुमारे चार कोटी ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेने प्रवास केला. त्या सर्वांकडून भाड्याचे पूर्ण पैसे वसूल करण्यात आलेत. माहितीच्या अधिकारातून मागविलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. मध्यप्रदेशमधील रहिवासी असलेल्या चंद्रशेखर गौड यांनी माहिती अधिकारांतर्गंत ही माहिती मागवली होती.
ज्येष्ठ नागरिक पुरुषाला रेल्वेमधून प्रवास करताना भाड्यात 40 टक्के सूट देण्यात येते, तर ज्येष्ठ नागरिक महिलेला 50 टक्के सूट देण्यात येते. या योजनेसाठी महिलेचे वय हे 58 वर्षांपेक्षा अधिक असावे लागते, तर पुरुषाचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक असावे लागते. कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेने प्रवास करताना भाड्यात सवलत दिली जावी की नाही, यामध्ये देखील दोन मतप्रवाह आहेत. मध्यतंरी रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी वृद्धांना देण्यात येणारी भाडे सवलत बंद करावी असा विचार देखील मांडण्यात आला. यासाठी 2016 ला एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालानंतर 2017 पासून भाड्यात सूट हवी आहे की नको हे ऐच्छिक करण्यात आले.