Home > News Update > कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयावह...

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयावह...

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर असून दुसऱ्या लाटेचा रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मृत्युदर कमी करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, औषधं, उपचार पद्धती याबाबत उपाययोजना आखाव्या लागतीत. तिसरी लाट येईल की नाही हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे रिस्क घेऊन चालणार नाही. त्यामुळं अधिकाधिक लसीकरण वेगाने पूर्ण करावं लागेल, असं अभ्यासपूर्ण विश्लेषण आमदार रोहित पवार यांनी समाज माध्यमांवर केला आहे..

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट  भयावह...
X

आज कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण वाढलेला आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यात कोरोना जवळपास हद्दपार झाल्याचं वाटत होतं, परंतु फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून मात्र कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढायला सुरवात झाली. एप्रिल महिन्यात तर कोणी अंदाजही केलेला नसेल इतक्या प्रचंड वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आपण ११ फेब्रु रोजीची आकडेवारी बघितली तर आपल्या राज्यात तीस हजार रुग्ण उपचार घेत होते, आजच्या घडीला उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या सात लाखाच्या जवळ आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अतिशय भयावह आहे. गेल्या वर्षी पाच-सहा दिवसात रुग्ण बरा व्हायचा तर आता मात्र रुग्ण बरा व्हायला सरासरी १५ दिवसाचा कालावधी लागतो. रुग्ण बरा होण्याचा दरही कमी झाला आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर ९५.८ % पर्यंत होता, परंतु नंतरच्या काळात मात्र हा दर कमी कमी होत आता ८१% पर्यंत खाली आला आहे. कोरोनाचे नवे स्ट्रेन्स, म्युटेशन यामुळे रुग्ण उपचाराला अतिशय संथ गतीने प्रतिसाद देत असल्याने रुग्ण बरा होण्यास अधिक कालावधी लागतो.


कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट खूप वेगळी दिसते. 'आयसीएमआर'च्या माहितीनुसार दुसऱ्या लाटेत असलेली लक्षणे पहिल्या लाटेपेक्षा भिन्न आहेत. पहिल्या लाटेत कोरडा खोकला, सर्दी, डोकेदुखी यासारखी लक्षणे अधिक होती. या लाटेत मात्र अनेक रुग्णांना श्वासासंबंधी अडचणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. तसंच व्हेंटिलेटरवरही रुग्णांना अधिक दिवस ठेवावं लागतंय. पहिल्या लाटेत ४१% रुग्णांना ऑक्सिजन लागत होता तर आता मात्र ५४% रुग्णांना ऑक्सिजन लागतो. नव्या स्ट्रेन्सचा प्रसाराचा वेग अधिक असून त्यामुळे काही दिवसात अचानक वाढलेली रुग्ण संख्या, रुग्ण बरा होण्यास लागणारा अधिकचा कालावधी या सर्व गोष्टी एकाच वेळेत आल्याने आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. कितीही भक्कम आरोग्य व्यवस्था असली तरी एवढा अचानक आलेला ताण सहन करू शकत नाही.

दुसऱ्या लाटेत आपल्या राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहेच शिवाय मृत्युदर राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी आहे. आपल्या देशाचा रुग्ण बरा होण्याचा दर ५७% तर राज्याचा दर मात्र ६८ % आहे. मृत्युदराच्या बाबतीत बघितलं तर देशाचा मृत्युदर ०.६० % तर राज्याचा मृत्युदर ०.५६% इतका आहे. पहिल्या लाटेत आपला राज्याचा मृत्युदर २.५% एवढा होता, हाच मृत्युदर दुसऱ्या लाटेत कायम राहिला असता तर आपण कल्पना करू शकत नाही त्याहून कितीतरी वाईट परिस्थिती निर्माण झाली असती. आज दुसऱ्या लाटेत होणारी हानी कितीतरी पटीने कमी झाली असेल तर सर्व श्रेय दिवसरात्र झटणाऱ्या आरोग्य यंत्रणेचं आहे.

राज्यात लॉकडाऊन करताना अनेक स्तरातून विरोध होत होता. लॉकडाऊन करताना राज्य सरकारने सर्व घटकांशी चर्चा करून शेवटी नाईलाजाने लॉकडाऊन केला. आज आपण राज्याची आकडेवारी बघितली तर आकडेवारी कुठे तरी स्थिरावताना दिसतेय. आरोग्य यंत्रणेवर ताण वाढल्यास मृत्युदरही वाढत असतो. राज्यात ४० % रुग्णसंख्या पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर या जिल्ह्यांमध्ये आहे. मुबई, पुणे, ठाणे या ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होत आहे तर नागपूरमध्येही वेग कमी होत आहे. लॉकडाऊनमुळेही काही प्रमाणात कोरोनाचा वेग मंदावत आहे. त्यामुळे नागरिकांनीही पोलीस यंत्रणांना सहकार्य करणं अपेक्षित आहे.

ECOWRAP च्या अंदानुसार आपल्या देशात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात दुसरी लाट उच्चांकी स्तरावर असेल. एका रुग्णापासून दुसऱ्या रुग्णाला कोरोनाची लागण होण्याचा R-factor बघितला तर सध्या देशाचा R-factor १.६ एवढा आहे आणि महाराष्ट्राचा मात्र १.१ इतका असून इतर राज्यांच्या तुलनेत खूप कमी आहे. सध्या राज्यात स्थिरावत असलेली आकडेवारी, R-factor, रुग्ण बरा होण्याचा दर बघता दुसऱ्या लाटेच्या पिक मध्ये महाराष्ट्राबाबत काहीशी आशादायी परिस्थिती दिसते. परंतु आपण निश्चिंत होऊन बेसावध रहायचं असा याचा अर्थ नाही. कदाचित महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेने पिक गाठला असून यापुढे रुग्ण संख्या स्थिरावेल ही शक्यता आहे, परंतु ही शक्यता जर प्रत्यक्षात आणायची असेल तर गाफील न राहता अधिक काळजी घ्यावी लागेल.

दुसऱ्या लाटेची जिल्हानुसार परिस्थिती बघितली तर काही ठिकाणी रिकव्हरी रेट अत्यंत कमी तर काही ठिकाणी मृत्युदर अधिक दिसतो. गोंदिया (२२%), चंद्रपूर (२५%), रत्नागिरी (२५%) या जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट खूप कमी आहे. तर सिंधुदुर्ग (१.८५%), उस्मानाबाद (१.४८ %), नांदेड (१.३१ %) या जिल्ह्यांमध्ये मृत्युदर अधिक दिसतो. काही जिल्ह्यांमध्ये रिकव्हरी रेट जास्त असून मृत्युदर कमी आहे. आपल्याला आकडेवारी आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन त्या आधारावर जिल्ह्यांची विभागणी करून रणनीती आखावी लागेल.

सध्या राज्याचा दुसऱ्या लाटेचा रिकव्हरी रेट वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा, औषधं, उपचार पद्धती याबाबत उपाययोजना आखाव्या लागतीत. तिसरी लाट येईल की नाही हे सध्या तरी कोणी सांगू शकत नाही, त्यामुळे रिस्क घेऊन चालणार नाही. त्यामुळं अधिकाधिक लसीकरण वेगाने पूर्ण करावं लागेल. त्यादृष्टीने राज्य सरकारने घेतलेला मोफत लसीकरणाचा निर्णय महत्त्वपूर्ण म्हणता येईल.

तूर्तास तरी सर्वांनी एकदिलाने लढत आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे.

Updated : 26 April 2021 7:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top