सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उत्सव व्हावा- वर्षा गायकवाड
X
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, कोरोनामुळे (Coronavirus) राज्यातील बहुतेक शाळा मागील दीड वर्षांपासून बंद होत्या. या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. तर, शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. पण राज्य सरकारने जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी पाल्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे.त्यामुळे आता शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या निर्णयाला विद्यार्थी-पालक कसे प्रतिसाद देतात हे आज पाहावं लागेल. दरम्यान शाळा सुरू करतांना सरकारने काही नियम घालून दिले आहेत.
राज्यातील काही भागांत तब्बल दीड वर्षांनंतर शाळा सुरक्षितपणे पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षणाचा उत्सव होऊन विद्यार्थ्यांचे स्वागत व्हायला हवे, याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या सूचनांनुसार, मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावं. वाहनांने विद्यार्थी येत असतील तर वाहनांमध्ये एका सीटवर केवळ एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल, याची दक्षता घ्यावी. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंगला महत्त्व आहे त्यामुळे वर्गातही योग्य शारीरिक अंतर राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वर्गात एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, शाळेत प्रार्थना, स्नेहसंमेलन किंवा तत्सम गर्दी होणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाही.
जास्त विद्यार्थी असलेल्या शाळा दरदिवशी दोन सत्रांमध्ये भरतील. यासोबतच प्रत्यक्ष वर्गांचा कालावधी 3 ते 4 तासांपेक्षा अधिक नसावा, असा सुचना देण्यात आल्या आहेत. सोबतच वर्गांसाठी जेवणाची सुट्टी नसेल, एक-दोन आठवड्यांमध्ये थेट शिक्षणावर भर न देता, विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी. कोव्हिड होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे, अशा सुचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.
बालमित्रांनो,
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 3, 2021
शाळेतल्या पहिला दिवस कायम स्मरणात राहिल, असा घालवा. विशेषतः दीर्घ कालावधीनंतर उगवलेला हा दिवस उत्साहात साजरा करा.पहिल्या दिवसाचे उत्तम अनुभव आमच्यासोबत शेअर करा.शाळेतील तुमचे फोटो,व्हिडिओ,गाणी,कविता @thxteacher या ट्विटर खात्याला टॅग करून पोस्ट करा.#शाळेचापहिलादिवस pic.twitter.com/HE79xr5Abs
दरम्यान शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत विद्यार्थांना शाळेतला पहिला दिवस कायम स्मरणात राहिल, असा घालवण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केलं आहे.