Home > News Update > ठरलं, बालवाडी ते बारावी, राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार

ठरलं, बालवाडी ते बारावी, राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार

ठरलं, बालवाडी ते बारावी, राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार
X

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील शाळा आता पुन्हा सुरू होणार आहेत. २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्यातील सर्व शाळा सुरू करण्या संदर्भातला प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवला होता. त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राज्यातील सर्व वर्गांच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे आता शाळा सुरु करण्यासंदर्भात अधिकार देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्याचबरोबर आता पूर्व प्राथमिक वर्गांसह पहिली ते बारावीपर्यंतचे सगळे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासनाने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी आहे तिथे बालवाडीपासून बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

त्याचबरोबर लहान मुलांचे लसीकरण शाळेत करता येईल का याबाबतही शिक्षण विभाग चाचपणी करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना लसीचे दोन्ही डोस झालेले असणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती देखील वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. मुलांना शाळेत पाठवताना पालकांचे संमतीपत्र बंधनकारक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Updated : 20 Jan 2022 3:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top