शाळा पुन्हा सुरु : शिक्षणमंत्र्यांच्या विद्यार्थांना शुभेच्छा..
X
ग्रामीण भागाबरोबरच शहरातील राज्यभरातील शाळा अठरा महीन्यानंतर पुन्हा सुरु झाल्या असून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी त्यांनी सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्यभरातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरु झाल्या आहेत. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत प्रत्यक्ष पाऊल ठेवत असल्याने आणि मित्र परिवार पुन्हा भेटल्याने विद्यार्थी देखील उत्साहात आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
करोना केसेसचे प्रमाण कमी झाल्यानंतर टास्क फोर्सशी चर्चा करुन शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला. करोना प्रतिबंध सर्व नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्या आहेत. दरम्यान वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे पालक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु होत आहेत. यानिमित्ताने विद्यार्थी आणि पालकांना मनापासून शुभेच्छा! आजचा शाळेतील पहिला दिवस आपण सुरक्षित आणि आनंदीत वातावरणात घालवाल, असा मला ठाम विश्वास आहे, असे ट्वीट वर्षा गायकवाड यांनी केले.
राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा एकदा सुरु होत आहेत. यानिमित्ताने विद्यार्थी आणि पालकांना मनापासून शुभेच्छा! आजचा शाळेतील पहिला दिवस आपण सुरक्षित आणि आनंदीत वातावरणात घालवाल, असा मला ठाम विश्वास आहे.#शाळेचापहिलादिवस #चलामुलांनोचला #BackToSchool
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) October 4, 2021
आज ठिकठिकाणी शाळा प्रवेशाचे स्वागत होत असताना मुंबईतील सायन येथील डी. एस. स्कुल या शाळेला वर्षा गायकवाड यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारल्या. शाळेच्या व्यवस्थापनाची पाहणी केली. #BackToSchool अंतर्गत शाळेत हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या; पहिल्या दिवसाच्या भावना जाणून घेतल्या. राज्यभरातील शाळांत शारीरिक अंतर राखून वर्ग भरवले जात आहेत, यावर शाळा व्यवस्थापन कमिटी सातत्याने लक्ष ठेऊन असल्याची माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, शहरातील अनेक शाळांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांना सॅनिटायझर, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली असून, त्यामध्ये साबण आणि पाणी २४ तास उपलब्ध राहील, याची काळजी घेण्यात आली आहे. वर्गखोल्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एका बाकावर एक जण बसेल, याची काळजी घेण्यात येईल. वर्गात अधिकाधिक हवा खेळती राहील, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.