Home > News Update > PM modi security breach : सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती नेमण्यास सहमती

PM modi security breach : सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती नेमण्यास सहमती

PM modi security breach : सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती नेमण्यास सहमती
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिरोजपुर दौऱ्यादरम्यान सुरक्षेसंदर्भात त्रुटी आढळल्याचं प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली.

आज पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ही समिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींची चौकशी करणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि पंजाब सरकारला त्यांची चौकशी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या समितीत चंदीगड डीजीपी, एनआयएचे आयजी, पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाचे रजिस्ट्रार जनरल, पंजाब चे एडीजीपी यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अगोदर शुक्रवारी पार पडलेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यासंदर्भातील सर्व कागदपत्र पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाच्या रजिस्टर जनरल यांना ताब्यात घेण्यास सांगितले होते. तसेच, या दौऱ्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या केंद्र सरकार आणि पंजाब सरकार यांच्या चौकशी समित्यांना सोमवार पर्यंत ( आज पर्यंत ) काम थांबवायला सांगितलं होतं.

दरम्यान पंजाब सरकारने हे सगळं प्रकरण गंभीरतेने घेत पंजाबच्या डीजीपींची बदली केली आहे. तसंच फिरोजपुरच्या एसपींना निलंबित करण्यात आलं आहे. पंजाब सरकारने यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

पंजाब सरकारने या सगळ्या प्रकरणासंदर्भात केंद्र सरकारला आपला रिपोर्ट पाठवला असून पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी यांनी या अहवालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कुठे चूक झाली? या मुद्द्यांचा समावेश केला आहे.

पंजाब सरकारने या सगळ्या प्रकरणासंदर्भात दोन सदस्यीय कमिटीची घोषणा केली असून यामध्ये एका निवृत्त न्यायाधीशांचा समावेश आहे. " या समितीचे कामकाज सर्वोच्च न्यायालयाने थांबलेलं आहे. वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे.

काय घडलं सर्वोच्च न्यायालयात?

सुनावणीत केंद्र सरकारने सांगितले की, ब्लू बुकनुसार पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नव्हती. राज्यातील डीजीपींच्या देखरेखीखाली या मार्गावर सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार होती, मात्र ती लॅप्स झाली. याप्रकरणी पंजाबच्या अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर कोणतीही कारवाई झाली नाही.

दुसरीकडे केंद्र सरकार पंजाबच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून धमकावत असल्याचा युक्तिवाद पंजाब सरकारने केला आहे. कोणी अधिकारी जबाबदार असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, मात्र आरोप करू नयेत. पंजाबचे महाधिवक्ता डीएस पटवालिया यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली.

काय आहे सर्व प्रकरण?

तीन कृषी कायदे रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ जानेवारी ला पंजाब दौऱ्यावर होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंजाब दौरा रद्द करून राजधानी दिल्ली येथे परतावे लागले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिरोजपुर येथे मोठी सभा होणार होती. या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 42 हजार 750 कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन करणार होते. मात्र, ही सभा रद्द करण्याची वेळ भाजपवर आली.

पंतप्रधान पंजाब मधील बठींडा येथे पोहोचले. मात्र, या ठिकाणाहून पुढे जाण्यासाठी हवामान खराब असल्याने मोदी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करणं अशक्य होतं. मोदींना त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट द्यायची होती. मात्र, हवामान खराब असल्याने त्यांनी हेलिकॉप्टर ऐवजी सडक मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने जात असताना शहीद स्मारकापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० किलोमीटर अंतरावर एका फ्लाय ओव्हर वर २० मिनिटे थांबावं लागलं.

तीन कृषी कायद्या दरम्यान पंजाब मधील शेकडो शेतकर्‍यांचा मृत्यू झाला होता. मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेतले असले तरी या ठिकाणी मोदी यांचा शेतकऱ्यांनी विरोध सुरूच ठेवला आहे. त्यामुळे मोदींना या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दरम्यान, मोदींना एका फ्लाय ओव्हर वर २० मिनिटे थांबावं लागल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात आणि सुरक्षेसंदर्भात पंजाब सरकार कडून हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात पंजाब सरकार कडून स्पष्टीकरण मागवले होते. तसेच, या प्रकरणात हलगर्जी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर पंजाब सरकारने एका निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. तिचं काम सर्वोच्च न्यायालयाने थांबवले आहे.

भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केला होता. पंतप्रधानांचा मार्ग रोखला गेला असतांनाही मुख्यमंत्री चन्नी यांनी फोन घेतला नाही असा आरोप केला होता. तर, चन्नी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भठींडा ते फिरोजपुर हवाई मार्गाने जाणार होते. त्यांचा रस्त्याने जाण्याचा नियोजित दौरा नव्हता .

ऐन वेळेस, त्यांनी पर्यायी मार्ग म्हणून रस्त्याने जाण्याचा मार्ग निवडला. त्यांनी पंजाब सरकारला अगोदर कळवायला हवं होतं. आम्ही VIP मुमेंट साठी पर्यायी मार्गाची निवड केली असती. तसेच, फिरोजपुर रॅलीला फक्त ७०० लोक असल्याने ही रॅली कॅन्सल करण्याची वेळ भाजपवर आल्याचे त्यांनी म्हटले होते.

दरम्यान पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर भाजप आणि काँग्रेस मध्ये मोठा राजकीय वाद रंगला होता.

कोणी काय म्हटलं?

मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी…

पंतप्रधानांच्या जीवाला धोका असता तर आधी मी माझं रक्त सांडले असतं

आम्ही आमच्या पंतप्रधानांवर कुठलेही संकट येऊ देणार नाही

यात बिनकामाचं राजकारण करू नये

सुरक्षेतत कुठलीही त्रुटी नव्हती

रस्त्याने जाण्याचा निर्णय केंद्रीय यंत्रणांनीच घेतला

रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

आम्ही देशाचे दोन पंतप्रधान देशासाठी गमावले आहेत.. पंतप्रधानांच्या सुरक्षेचं महत्व काय याची जाण काँग्रेसला आहे. पण शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आलेल्या अपयशाचं खापर भाजपने काँग्रेसवर फोडू नये.

स्मृती इराणी…

देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक

काँग्रेसचे रक्तरंजित मनसुबे अयशस्वी झाले

काँग्रेसचे नेते आनंदात का आहेत? इराणी यांचे सवाल…

पंतप्रधानांच्या ताफ्याचा मार्ग आंदोलकांपर्यंत कोणी पोहोचू दिला?

Updated : 11 Jan 2022 11:49 AM IST
Next Story
Share it
Top