पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत घर घ्यावं, संजय राऊत यांचा सल्ला
तीन आठवड्यात पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.
X
पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी मेट्रो तसेच मुंबईतील (Mumbai) रस्त्यांचे उद्घाटन केल्याच्या घटनेला तीन आठवडेही पूर्ण झाले नाहीत. त्यातच पंतप्रधान मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महापालिका निवडणूकीची तारीख ठरत नाही. तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुक्काम मुंबईत राहील, याविषयी शंका नाही. पण भाजप आणि शिंदे सरकारने कितीही मोदी कार्ड वापरले तरी मुंबईत सत्ता शिवसेनेचीच (Shivsena) येणार, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
संसदेत अनेक महत्वाच्या घटना घडामोडी सुरु आहेत. मात्र मोदी मुंबईत येतात. त्यांना महापालिका जिंकायची आहे. पण हे मिंधे गटाचे स्पष्ट अपयश आहे. मोदी मुंबईत येत आहेत. त्याविषयी आम्हाला काही अडचण नाही. त्यांनी मुंबईत यावं, मुंबईत घर घ्यावं, राजभवन वर रहावं, पण काहीही झालं तरी त्यांना महापालिका मिळणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून लगावला.
अदानींच्या मागे कोणती शक्ती?
पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अत्यंत सोप्या प्रश्नांची उत्तरं दिले नाहीत. ते का दिले नाहीत? अदानीच्या (Adani) मागे कोणती शक्ती आहे? हे पंतप्रधान मोदी यांनी सांगायला हवे. याबरोबरच संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत अदानी समुहाची चौकशी व्हावी, अशी मागणी माझी आहे, असंही संजय राऊत यांनी सांगितले.