Home > News Update > साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ठराव.

साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ठराव.

साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, 97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात ठराव.
X

खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर : पूज्य साने गुरुजी आणि निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर ‌‘भारतरत्न' देण्यात यावा यासह विविध 10 ठराव 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आले. 2 तारखेपासून सुरू झालेल्या संमेलनाचे रविवारी सायंकाळी सूप वाजले. समारोपाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. खान्देशला साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. समाजात साहित्याचे स्थान हे कायम आदरणीय आणि पूजनीय राहिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या 97व्या साहित्य संमेलनाचा रविवारी सायंकाळी यशस्वी समारोप झाला. समारोपप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन लाईव्ह उपस्थित होते. संमेलनाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महामंडळाच्या अध्यक्षा डॉ.उषा तांबे उपस्थित होते.

97 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील ठराव -

  • १) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मांडला.
  • २) ग्रामिण भागात अनेक मराठी शाळा बंद पडून दुसऱ्या शाळांबरोबर जोडल्या जात आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालक ह्यांच्या अडचणी वाढत आहेत. यावर सरकारने परिणामकारक योजना कराव्यात अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ३) मराठीसह सर्व भारतीय भाषांची आकाशवाणी दिल्ली येथून प्रसारीत होणारी राष्ट्रीय वार्तापत्रे त्या-त्या राज्यांच्या राजधानीत पाठविण्यात आली त्यामुळे त्या भाषांचे दिल्लीतील राष्ट्रीय स्थान संपुष्टात आले आहे. ही वार्तापत्रे पुन्हा दिल्लीहून प्रसारीत व्हावी अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ४) गुजराथी, मराठी शब्दकोशाची आवृत्ती सुधारून परत तयार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ५) बृह्नमहाराष्ट्रातील मराठी शिक्षण संस्थांना आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने एक रकमी अनुदान द्यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ६) काळाच्या ओघात कान्हादेशाचे अपभ्रंश होऊन खान्देश असे नामकरण झाले आहे ते पूर्ववत कान्हादेश असे करण्यात यावे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ७) अनेक पिढ्यांवर संस्कार करणारे प. पूज्य साने गुरूजी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ८) कान्हादेशाचे वैभव असलेल्या प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्याची विनंती केंद्र सरकारकडे महाराष्ट्र शासनाने करावी अशी मागणी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • ९) मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक विचारवंतांनी पुरावे दिले आहेत आणि साहित्य संस्थांनी लोक चळवळ उभारून हा विषय ऐरणीवर आणला आहे, तरीही महाराष्ट्र शासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून त्याचा पाठपुरावा होतांना दिसत नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाच पाहिजे अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.
  • १०) जळगांव व धुळे जिल्ह्याचा चेहरा-मोहरा बदलणारे पाडळसे धरण केंद्र शासनाच्या योजनेत समाविष्ट करून तसा प्रस्ताव केंद्राच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट होणेसाठी महाराष्ट्र शासनाने त्वरीत पाठवावा अशी मागणी हे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.



Updated : 5 Feb 2024 10:19 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top