#AryanKhancase : चौकशी तूर्तास समीर वानखेडे यांच्याकडेच राहणार
X
NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर आर्यन खान प्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे राहते की नाही, याबाबत उत्सुकता होती. पण तूर्तास या प्रकरणाची चौकशी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालीच केली जाईल, असे NCBच्या उत्तर विभागाचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी साक्षीदार प्रभाकर साईल यांनी NCBचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचा गंभीर आरोप केला आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी याप्रकरणातील पंच किरण गोसावीच्या माध्यमातून वानखेडे यांनी शाहरुख खानकडे २५ कोटींच्या खंडणीची मागणी केली होती, असा दावा साईल यांनी केला आहे. प्रभाकर साईल हे किरण गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. तसेच राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर खोटे जातप्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर समीर वानखेडे यांची NCBतर्फे विभागांतर्गत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आली. मंगळवारी समीर वानखेडे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांची बुधवारी काही तास खात्यांतर्गत चौकशी करण्यात आली.
तसेच या प्रकरणी चौकशीसाठी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली NCBचे पथक मुंबईमध्ये दाखल झाले आहे. दरम्यान समीर वानखेडे यांच्याविरोधात लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी ठोस पुरावे हाती लागत नाहीत तोपर्यंत क्रुझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखालीच चौकशी केली जाईल, असे ज्ञानेश्वर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान माध्यमांनी समीर वानखेडे यांना आज संपर्क केला असता आपल्याला या प्रकरणात काहीही बोलायचे नाही, असे वानखेडे यांनी स्पष्ट केले आहे.