खंडणी प्रकरणात सचिन वाझेला 13 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी
अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर सचिन वाझेला 13 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी. काय घडलं न्यायालयात वाचा:
X
मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे च्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 13 नोव्हेंबर पर्यंत वाढ केली आहे.
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या खंडणी प्रकरणात ही पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सचिन वाझेच्या 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, त्यांना 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या अगोदर न्यायालयाने सचिन वाझेला 6 नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावली होती.
दरम्यान आज याच प्रकरणात अटकेत असलेल्या अनिल देशमुख यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असता, अनिल देशमुख यांच्या वकीलाने लगेच जामीन अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर 12 नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे.
अनिल देशमुख यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 12 तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी ED ने त्यांना अटक केली होती. ED ने न्यायालयात अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. आज पार पडलेल्या सुनावणीत ED ने देशमुख यांची कोठडी मागितली होती. न्यायालयाने ED ची ही मागणी फेटाळत देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली होती. या बदलीनंतर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला 100 कोटी रुपयांचं खंडणी वसुल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या आरोपाची चौकशी सध्या ED करत आहे.