Saamana Editorial - काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेनेचा ‘सामना’
X
भारत-चीन दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना देशात आता याच मुद्द्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पण काँग्रेसशी नंतर लढा आधी चीनचे बघा असा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर चीनबाबत मोदी सरकारच्या धोरणांवरही जोरदार हल्ला करण्यात आला आहे. या अग्रलेखात काय म्हटले आहे ते पाहूया...
चीनशी कोणी लढायचे?
चीनने माघार घेतली व दोन देशांतील सैन्य कमांडरांमध्ये चर्चा होऊन तणाव निवळला हे जे रोज सांगितले जात होते त्यातला फोलपणा समोर आला आहे. लडाख व चीनच्या सीमेवर तणाव कायम असून हिंदुस्थानची डोकेदुखी वाढेल अशा हालचाली चीन करत आहे. बोलायचे एक आणि करायचे दुसरेच हे चीनचे राष्ट्रीय धोरण असावे. चीनला युद्ध नको आहे, पण सीमेवर युद्धासारखी परिस्थिती निर्माण करून हिंदुस्थानला स्वस्थता लाभू द्यायची नाही, असे त्यांचे धोरण आहे. गलवान खोऱयातून आपले सैनिक व वाहने मागे घेण्याची तयारी चीनने दाखवली. पण त्याच वेळी चिनी लष्कराने लडाखच्या डेपसांग सेक्टरमध्ये नवे तंबू ठोकले. तोफा, रणगाडे आणले. लष्कर वाढवले. चीनची हेलिकॉप्टर तेथे उतरू लागली. म्हणजे काही झाले तरी चिनी सैन्य लडाख सोडायला तयार नाही. म्हणजे चीनने आता नवी चढाई केली आहे व ते आमच्या हद्दीतून मागे हटायला तयार नाहीत. चीनला युद्ध करायचे नाही, पण युद्धाची टांगती तलवार आमच्या डोक्यावर ठेवायची आहे. त्यामुळे पाकिस्तान, नेपाळसारखी राष्ट्रे चीनची अंकित राहतील. चीन दगाबाज आहे व त्याच्या कुरापती सदैव सुरूच राहतील. या कुरापती थांबविण्यासाठी आमची योजना काय आहे?
हे ही वाचा..
Samaana Editorial: चीनी गुंतणुकीबाबत राष्ट्रीय धोरण ठरवा – शिवसेना
Samana Editorial: “सरकारने आधी कोरोनाच्या तिरडीवरून उठावे; लोक आपोआप कामधंद्याला लागतील”
चीनच्या घुसखोरीबाबत प्रश्न विचारणाऱयांना आरोपीच्या पिंजऱयात उभे करून त्यांच्यावरच चीनचे हस्तक किंवा दलाल असल्याचे ठपके ठेवले जात आहेत. काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारले. त्यावर उत्तर द्यायचे राहिले बाजूला. काँगेसला चीनकडून पैसे मिळत आहेत, अशी पुरवणी माहिती भाजप नेत्यांनी दिली. काँगेसला पैसे मिळतात म्हणजे काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिल्लीतील चिनी वकिलातीकडून घसघशीत देणगी मिळाली असा फुगा भाजपने फोडला आहे. भाजपने त्या देणगीची माहिती प्रसिद्ध केल्याने सीमेवरील चीनच्या हालचालीवर निर्बंध येणार आहेत काय? राजीव गांधी फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांचा संबंध चिनी घुसखोरी किंवा आमचे जे 20 जवान शहीद झाले त्या घटनांशी असेल तर भाजपने तसे स्पष्ट करावे.
काँगेस पक्षाच्या राजीव फाऊंडेशनला कोणत्या देशातून पैसे मिळाले यावर भाजपने यापूर्वी अनेकदा चर्चा केल्या. त्यात नवीन काय? आपल्या देशातील अनेक राजकीय पक्ष व पुढारी हे परराष्ट्रांचे लाभार्थी आहेत. फक्त काँग्रेसच नाही. भाजपने तर यावर बोलणे म्हणजे चिखलात दगड मारून स्वतःच्या अंगावर शिंतोडे उडवून घेण्यासारखे आहे. हमाम मे सब नंगेच आहेत! पण सध्या प्रश्न आहे तो चीनबरोबर लढण्याचा. गलवान खोऱ्यात चीनकडून नव्याने बांधकाम सुरू झाले आहे. अरुणाचल, सिक्कीम मार्गाने त्यांचे सैन्य धडक मारत आहे. त्यामुळे राजकीय साठमारी बाजूला ठेवून एकत्र येणे गरजेचे आहे. काँगेस पक्षाशी भाजपला नंतर केव्हाही लढता येईल. आज चीनशी लढायचे आहे. त्यावर काय ते बोला!