Home > News Update > मुंबईतले उद्योग पळवून न्याल, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही : `सामना`तून योगींवर टीकेचे बाण

मुंबईतले उद्योग पळवून न्याल, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही : `सामना`तून योगींवर टीकेचे बाण

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळं भाजपा-शिवसेनेतील राजकीय आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मुंबईतील बॉलीवूड उत्तरप्रदेशात नेणं पाकीट मारण्याइतकं सोपं नसल्याची कबुली योगींनी दिल्यानंतर आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून टिकेचे टोकेरी बाण सोडण्यात आले आहेत.

मुंबईतले उद्योग पळवून न्याल, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही : `सामना`तून योगींवर टीकेचे बाण
X

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मनाने साधू महाराज आहेत. या साधू महाराजांचे मुंबईत आगमन झाल्यावर ते ओबेरॉय ट्रायडण्टच्या समुद्रकिनाऱ्यावरील मठात निवासाला होते. या ट्रायडण्डच्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा 'चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा' अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराजांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उत्तर प्रदेशचा विकास झालाच व त्यातून रोजगार निर्मिती घडली तर मुंबईवरील बराचसा ताण कमी होईल. त्यामुळे योगींच्या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडमधील काही लोकांशी उत्तर प्रदेशातील फिल्म सिटीबाबत चर्चा केल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा एकदा योगी आदित्यनाथांवर टीका केली आहे. उत्तर प्रदेशचे गुन्हेगारी वास्तव, कायदा आणि सुव्यवस्था याचे जळजळीत चित्रण 'मिर्झापूर-१ व ३' या वेब सीरिजमध्ये आहे. बहुसंख्य उत्तर प्रदेशची स्थिती 'मिर्झापूर'प्रमाणेच असल्याचा आरोप योगी राज्यातील विरोधक करीत असतात. आता 'मिर्झापूर-३'ची निर्मिती नव्या मायानगरीत होणार असेल तर आनंदीआनंदच असल्याचं सेनेनं म्हटलं आहे.

एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची 'प्यारी बहना' झाली. भाजपच्या त्याच नटीने 'पीओके' म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. खऱ्या 'पीओके'ची कायदा-सुव्यवस्था 'मिर्झापूर'पेक्षा वेगळी नाही! उत्तर प्रदेशची बदनामी थांबवा, कायदा-सुव्यवस्था राखा. मायानगरी आपोआप निर्माण होईल, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

साधू महाराजांचा मायानगरीत येण्याचा मूळ हेतू असा आहे की, मुंबईच्या मायानगरीप्रमाणे अतिसुंदर अशी मायानगरी उत्तर प्रदेशात निर्माण करावी. मायानगरी निर्माण व्हावी यासाठी त्यांच्या सरकारने यमुना एक्प्रेसजवळ एक हजार एकर जागा दिली आहे. साधू महाराज आता पुढील कार्यवाहीसाठी मुंबईत आले. 'ट्रायडण्ट'च्या मठात त्यांनी मुंबईतील सिने जगतातील प्रमुख मंडळींशी सल्लामसलत केली. योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे.

गेली कित्येक वर्षे लाखो उत्तर भारतीय मुंबईत काबाडकष्ट करून त्यांच्या मेहनतीची रोटी खात आहेत. आपले घरदार सोडून या मंडळींना मुंबईत का यावे लागले, याचा विचार योगी महाराजांनी करायला हवा. फिल्म सिटी हवीच, पण या बेरोजगारांच्या हातास काम मिळाल्याशिवाय योगींच्या संकल्पित मायानगरीत सोन्याचा धूर निघणार नाही. उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे.

त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळय़ांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत, सामनानं म्हटलं आहे.

Updated : 3 Dec 2020 12:29 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top