शेतकरी आंदोलन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी सरकारवर नाराज?
X
नवीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत. पण सरकार अजूनही शेतकऱ्यांचे समाधान करु शकलेले नाही. य़ातच आता भाजपची पालक संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या मुद्दयावर मोदी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली आहे. द इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी शेतकरी आंदोलनावर संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतेही आंदोलन दीर्घकाळ चालणे हे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही, त्यामुळे दोन्ही बाजूंनी चर्चा करुन यावर तोडगा काढला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
चर्चेच्या आधीच कायदे रद्द करण्याची अट घालणे योग्य नाही, सरकार चर्चेला तयार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आडमुठेपणा सोडून चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. पण शेतकरी आंदोलनात माओवादी, खलिस्तानी घुसल्याचा आरोप केला गेला तर चर्चा कशी होणार या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हटले हा आरोप सरकारने केलेला नाही इतर काहींनी केला आहे.
पण आंदोलनात असे कोण लोक आहेत ज्यांना चर्चाच नकोय ते समोर येणे गरजेचे आहे, असे भैय्याची जोशी यांनी म्हटले आहे. यावर तोडगा काय या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हटले की ते आमचे काम नाही, ते सरकारचे काम आहे. असे अनेक मुद्दे आहेत ज्यांच्यावर सरकारने तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे. पण कायदे रद्द होणार नाहीत पण त्यात सुधारणा होऊ शकतील असे मात्र त्यांनी म्हटले आहे.