‘नितीन गडकरींनी एकदा भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करावा’- लक्ष्मण हाके
Max Maharashtra | 17 Sept 2019 7:44 PM IST
X
X
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मग ती वक्तव्यं विरोधकांसाठी असो किंवा आपल्याच पक्षातील नेत्यांसाठी असोत. यावेळी गडकरी नागपूर येथे अखिल माळी समाजाच्या अधिवेशनातील आरक्षण संबधीत भाष्यामुळे चर्चेत आहेत. नितीन गडकरी यांनी “आपल्या जातीला आरक्षण नसल्यामुळे आपण सुदैवी आहोत. आरक्षण नसल्यामुळेच मी इथवर पोहचलो” असं म्हटलं आहे. सोबतच “आपल्या जातीला आरक्षण नाही हे बरंय. कारण आरक्षण असतं तर, मी कुठंतरी सरकारी बाबू म्हणून काम करत असतो. घरच्यांना मी कायम सांगत होतो. मला नोकरी करणारा व्हायचं नाही तर, नोकरी देणारा व्हायचं आहे.” असेही म्हणाले.
नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यांवर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते प्रा. लक्ष्मण हाके यांनी विरोध दर्शवत नागपूर येथील माळी समाजाच्या मेळाव्यात आरक्षणासंदर्भात मा. नितीन गडकरी यांनी केलेले वक्तव्य बेजबाबदार पणाचा कळस असुन ‘सामाजिक न्यायासह समता’ या घटनेच्या गाभ्याला धक्का पोहचवणारे आहे” असं म्हटलं आहे.
“आरक्षण घेणारे फक्त सरकारी बाबूच होतात हा त्यांचा गैरसमज असुन राष्ट्रपती पदापासून अनेक महत्वपूर्ण पदावर आरक्षण कोट्यातून आलेल्या आमदार आणि खासदारांनी प्रभावशाली कामं केलेली आहेत. आरक्षणाचा बेसिक अर्थ समजून घ्यायला हवा. आजही फासेपारधी, कोंची कोरवी, गोल्ल, कुडमुडे जोशी या आणि अशा अनेक भटक्या जमातींची अजून गॅझेटला नोंद सुद्धा नाही. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे गरजेचे आहे. सह्याद्री पर्वत रांगातील आदिवासींना आरक्षणाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे. त्यांना विकासाच्या प्रवाहात आणणे हे जबाबदार शासन म्हणून, कॅबिनेट मंत्री म्हणून, नितीन गडकरी यांची जबाबदारी असताना एका मंत्र्याने असे घटना बाह्य वक्तव्य करणे म्हणजे द्रोह ठरू शकतो.” अशी टीका हाके यांनी केली आहे.
“आरक्षणाबाबतची संकुचित दृष्टी दिसून येते, त्यांनी एकदा भारतीय समाजव्यवस्थेचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ याचा अभ्यास करावा, स्पेशल ट्रेनिंग घ्यावे. बार्टी, सारथी, ज्योती या ट्रेनिंग सेंटर मध्ये सहभागी व्हावे.” असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी लगावला.
Updated : 17 Sept 2019 7:44 PM IST
Tags: bjp LAKSHMAN MANE Maharashtra Election 2019 nitin gadkari reservation RSP नितीन गडकरी राष्ट्रीय समाज पक्ष लक्ष्मण हाके
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire