विविध मागण्यांसाठी आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
X
बुलडाणा : बुलडाणा शहरातील कमेला परिसर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 6 इंची पाईपलाईन बसवणे, टिपू सुलतान चौकातील जगदंबा माता मंदिर परिसरातील नालीचे बांधकाम करणे व गवळीपुरा येथील नालीचे बांधकाम त्वरित करण्याकरिता आरपीआयचे तालुकाध्यक्ष फिरोज खान नुर खान यांच्या नेतृव्ताखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
9 ऑगस्ट रोजी नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन देऊन असे म्हटले होते की, गेल्या अनेक वर्षांपासून कमेला परिसरातील रहिवाशांना 3 इंची पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या लोकसंख्या पूर्वीच्या तुलनेत जास्त झाली आहे. सोबतच पूवीर्पेक्षा जास्त नळ जोडण्यांमुळे 3 इंच पाईपलाईनमधुन प्रत्येक घराच्या नळाले पाणी येत नसल्याची ओरड होत होती. याबाबत परिसरातील नगरसेवकांकडे अनेकवेळा तोंडी तक्रारी करूनही समस्या तशीच होती त्यामुळे या समस्येला कंटाळून स्थानिक नागरिकांनी आरपीआय तालुका अध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद प्रशासनाला 9 ऑगस्ट रोजी निवेदन दिले आणि लवकरात लवकर सदर मागणी पुर्ण करून परिसरात 6 इंची पाईपलाईन बसवण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता.
पालिकाप्रशासनाने आरपीआय निवेदनाची गंभीर दखल घेतली नाही म्हणुन आरपीआयचे तालुकाध्यक्ष फिरोज खान नूर खान यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आले आहे.