'गोड' तेलाच्या दरवाढीने जगणं झालं 'कडू'...
X
औरंगाबाद : एप्रिलमध्ये 4.23 असलेला महगाईचा दर मे महिन्यात तब्बल 6.3 टक्के झाला असून, गेल्या 6 महिन्यातील महागाईचा हा उच्चांक ठरला आहे. तर मे महिन्यात खाद्य तेलाचे दर तब्बल 31 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. अशीच काही झळ औरंगाबादच्या मीना जोगदंड यांना बसत आहे. मेस चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मीना जोगदंड यांच खाद्य तेलांमध्ये झालेल्या दरवाढीमुळे आर्थिक गणित बिघडलंय. आधीच कोरोनामुळे मेसचं डब्बे कमी झालेत, त्यात खाद्य तेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत.
पूर्वी सकाळ संध्याकाळ शंभर पेक्षा अधिक मेसचे डब्बे पुरवणाऱ्या मीना जोगदंड यांच्याकडे सद्या सकाळी 25 आणि संध्याकाळी 15 डब्बे सुरू आहेत. त्यामुळे पूर्वी पेक्षा अर्ध्याहून जास्त डब्बे कमी झालेत आहेत.आधी प्रत्येक डब्ब्यामागे 15 ते 20 रूपये वाचायचे,नंतर ते 5 रुपयांवर आले पण आता ते सुद्धा हातात पडत नसल्याचं असल्याचं मीना जोगदंड म्हणतात.
मीना जोगदंड यांच्याप्रमाणेच औरंगाबाद-पैठण रोडवर नाष्ट्याच हॉटेल असलेल्या सुदाम आष्टीकर यांची व्यथा आहे. नाष्ट्याच हॉटेल चालवताना प्रमुख घटक म्हणजे तेल, पण गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलात होत असलेल्या दरवाढीमुळे रोजनदारी निघणे सुद्धा कठीण झालं असल्याचं सुदाम म्हणतात. तर पूर्वी 80 रुपये लिटरने मिळणार गोड तेल आता 160 रुपयांपर्यंत जाऊन पोहचल्याने हॉटेल चालवणे अवघड झाल्याचं सुद्धा आष्टीकर म्हणतात.
खाद्य तेलांमध्ये दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचं बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, किराणा दुकानावर तेल घेणाऱ्यांची मागणी सुद्धा घटली आहे. लोकं पूर्वी पेक्षा कमी तेल वापरत असून, वाढत्या किंमतीमुळे लोकं वाद सुद्धा घालत असल्याचं किराणा चालक भाऊसाहेब शेळके सांगतात.
कधी गॅस दरात वाढ, कधी पेट्रोल डिझेल तर कधी खाद्य तेलात वाढ,त्यामुळे महागाई हा शब्द आता लोकांच्या जीवनाचा रोजचा भाग झाला आहे.