...रस्त्यावर उतरून लोकांना दगडं मारली नाही म्हणजे बर ; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखेंवर टीका
X
ठाणे : भाजपचे तत्वज्ञान किंवा कार्यपध्दती ही देशाच्या, जनतेच्या हिताची नाही, त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमाअंतर्गत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. त्यामुळे भाजपला ज्या ज्या पातळीवरुन दुर ठेवायचे असेल त्यानुसार ते ते निर्णय घेतले जातील असा विश्वास राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी सबुरीचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार कांती कोळी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी ते ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान कच्या तेलाच्या किमंती कमी झाल्यानंतरही इंधन दरवाढ होत आहे. दुर्दैवाने केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही, कॉंग्रेसच्या काळात जे एक रुपयाची जरी इंधन वाढ झाली तर आंदोलन करत होते. मात्र ते आता लपुन बसले आहेत का? त्यांचा शोध घेण्याची वेळ आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. त्यामुळे केंद्राने दर कमी करावेत असेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारची जबबादारी यात कमी असून राज्य सरकारची अडचण झाली असून 50 हजार कोटींची जीएसटीची रक्कम अद्यापही केंद्राने दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी राज्य सरकारला कर्ज काढावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी, सीआयडी या यंत्रणा पूर्वी माहित नव्हत्या, आता लहान मुलांनासुध्दा ईडी समजायला लागली आहे, या यंत्रणा राष्ट्रीय पातळीवरील असून विघातक प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी असाव्यात. मात्र त्या आता राजकारणासाठी वापरल्या जात असल्याने त्याचे दुष्परीणाम हे निश्चितच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांचा समाचार घेतांना भाजपमध्ये शांत झोप लागत असल्याचे ते सांगत आहे. परंतु तिकडे गेलेल्या लोकांवर किंवा भाजपमधील नेत्यांवर कारवाई होतांना दिसत नाही असाच होत आहे. परंतु सरकार कसे कमकुवत होईल, कसे पाडता येईल यासाठी केंद्र सरकार या संस्थांचा वापर करत आहेत, मात्र कितीही प्रयत्न केला तरी आमचे सरकार भक्कपणे राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणखी एका नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु अशा नेत्यांची आता किव येत आहे, मोठ्या आशेने त्यांनी भाजपात प्रवेश केला , शपथविधीचे स्वप्न पाहत होते, नवीन कपडेही शिवत होते, आज सरकार पडेल, उद्या सरकार पडले असे त्यांना वाटत होते, परंतु तसे होत नसल्याने त्यांच्यात नैराश्य आलेले आहे. त्यामुळेच असे बेताल वक्तव्य केले जात असल्याची टिका त्यांनी केली. अशा नेत्यांनी उद्या रस्त्यावर उतरुन लोकांना दगड मारले नाही, म्हणजे बर होईल असा टोलाही त्यांनी लगावला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही. परंतु तरी देखील हिवाळी अधिवेशन नागपुरला होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.