आतातरी भाजपने हुकूमशाही बंद करावी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका
X
बुलडाणा : भाजपाने आतातरी हुकूमशाही बंद करावी, जनतेपेक्षा सरकार मोठे नसते हे त्यांनी लक्षात घ्यावं अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपावर केली आहे. नवे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना थोरात यांनी भाजपावर निशाणा साधला. कृषी कायदे रद्द होण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल दीड वर्ष वाट पहावी लागली. मात्र, त्यांच्या आंदोलनाला यश आले, सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागले आणि अखेर त्यांनी कायदे मागे घेतल्याचे थोरात यांनी म्हणाले.
पुढे बोलताना थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले ही तीनही कृषी कायदे शेतकरी विरोधी होते. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तब्बल एक वर्ष आंदोलन केले. याकाळात अनेकदा शेतकरी आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न भाजपाने केला, मात्र त्यांना यश आले नाही. अखेर मोदी सरकार झुकले शेतकऱ्यांचा विजय झाला आणि कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली. या आंदोलन काळात काँग्रेस शेतकऱ्यांच्यासोबत होती आणि यापूढेही असेल असं थोरात म्हणाले.
दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर, विरोधकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे. पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तसेच येत्या काळात अनेक राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. भाजपाने निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केली आहे. भाजपाने कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली, याचा आम्हाला आनंद झाला, मात्र कायदे रद्द करण्यासाठी आता अधिवेशनाची वाट न पहाता ते तातडीने रद्द करावेत अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.