अखेर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अजित पवारांकडे
X
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे नियोजन विभागाकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या महामंडळाची ध्येय व उद्दिष्टे विचारात घेऊन हा विषय कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून वगळून, हा विषय नियोजन विभागाकडे सोपविण्याबाबतच्या प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली.
मराठा समाजाचं आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवण्यात आलं आहे. मराठा समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली सारथी संस्था विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन विकास कल्याण विभागातंर्गत येत होती.
मात्र, वडेट्टीवार हे ओबीसी असल्याने सारथीला न्याय देत नसल्याचा आरोप मराठा समाजातील काही नेत्यांनी केला होता. त्यानंतर सारथी संस्था आणि कौशल्य विकास विभागातंर्गत मोडत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या दोन्ही संस्था अजित पवार यांच्याकडे अर्थात नियोजन विभागाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला.