रिपब्लिक टीव्हीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मुसक्या मुंबई पोलिसांनी आवळल्या
X
उद्यापासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना आजच मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत टिआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानीला अटक केली आहे.
रिपब्लिकटिव्हीचा संपादक अर्णव गोस्वामी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या दरम्यान न्यायालयीन लढाई सुरू असतानाच आज सकाळी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत रिपब्लिक टीव्ही चा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानीच्या मुसक्या आवळल्या.
ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता.. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये विविध याचिका प्रलंबित असताना मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. रिपब्लिक वृत्तवाहिनीसह इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं या प्रकरणात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे खानचंदांनी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे.
उद्यापासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू होणार आहे या अधिवेशनादरम्यान रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावरील हक्कभंग प्रस्तावावर ही कारवाई होणार असल्याचे संकेत आहेत त्यामुळे आजच्या अटकसत्र मुळे पुन्हा एकदा रिपब्लिक विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा रणसंग्राम उभा राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.