लसीकरण सक्तीचे फतवे काढणं म्हणजे अक्कल दिवाळ खोरीत गेल्याचं लक्षण - रविकांत तुपकर
X
बुलडाणा : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला आमचा अजिबात विरोध नाही. कोरोनापासून वाचण्यासाठी लस ही घेतलीच पाहिजे आणि सगळ्यांनी लस घ्यावी असे आमचे मत आहे. परंतु लसीकरण केलं नाही म्हणून जर तुम्ही राशन बंद करणार असाल, तुम्ही संजय गांधी श्रावणबाळ निराधार योजनेचे अनुदान बंद करणार असाल, विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार नाही, भाजीपाल्याचे दुकान मांडू देणार, असे फतवे काढणं म्हणजे अक्कल दिवाळ खोरीत गेल्याचं लक्षणे आहे. बुलढाणा जिल्हा प्रशासनाने अशा पद्धतीचा आदेश काढून अकलेचे तारे तोडले आहेत, हे आम्हाला अजिबात मान्य नाही. असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
लसीकरण लोकांनी केलं पाहिजे यासाठी तुम्ही प्रबोधन करा, वेगवेगळे मार्ग अवलंबवा, लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवता येणार नाही,कारण आज राशन मिळालं नाही तर ते खाऊ शकत नाही, अनेक जणांना संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान नाही मिळालं तर त्याच्यावर त्याचे परिवार चालतात, हे होणार कसं? म्हणजे एका बाजुला बाप भीक मागू देत नाही आणि आई जेऊ घालत नाही अशी सामन्य लोकांची अवस्था आहे.
जेंव्हा लोक लस घ्यायला तयार होते तेंव्हा तुमच्याकडे लसीचा तुटवडा होता. मॅनेजमेंट बरोबर नसल्याने लोक इकडे तिकडे पळत होत आणि आता अशा पद्धतीची जबरदस्ती नाक दाबून तोंड उघडण्याचा प्रकार आहे, हा आम्हाला मान्य नाही. सक्ती करू नका ज्याने तो आदेश काढला आहे.तो आदेश मागे घ्या.लसीकरणासाठी काय मदत लागते सगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घ्या. पण मूलभूत सुविधापासुन वंचित ठेवणारा आदेश मागे घ्या अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा तुपकर यांनी दिला.