बलात्कार पीडित तरुणीचा पोलिसांनी छळ केल्याचा आरोप, पालकमंत्र्यांचे 3 दिवसात कारवाईचे आदेश
X
बीड - स्वतःवर सतत झालेल्या शारीरिक अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या, अत्याचारग्रस्त महिलेला पोलीसांनीच हिन वागणूक शिविगाळ केल्याचा आरोप पीडित नर्सने केला आहे. पोलिसांनी आपल्याविरुद्ध अर्वाच्च्य भाषा वापरल्याचा आरोप तिने काला आहे. बीडमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे अर्वाच्च्य भाषा वापरणार्याघ, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यामधील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला निलंबित करा आणि मला न्याय द्या, ही मागणी या पीडित महिलेने केली आहे. पीडित महिला ही पेशाने नर्स आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या नर्सने आमरण उपोषण सुरू केले होते. वंचित बहुजन आघाडीने या महिलेला पाठिंबा देत तिच्या आंदोलनता सहभागी झाले होते. आपल्याला न्याय नाही मिळाला, तर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या घरासमोर आत्मदहन करु असा संतप्त आणि टोकाचा इशारा पीडित नर्सने दिला आहे.
पालकमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन
दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडे या आंदोलनाची दखल घेतली आणि स्वत: आंदोलन स्थळी जाऊन त्या पीडित महिलेशी संवाद साधला. तीन दिवसांत या पोलिसांवर कारवाई करावी असे एसपींना दिले आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. यानंतर या पीडित महिलेने आपले आमरण उपोषण मागे घेतले आहे. पण तीन दिवसात या पोलिसांवर कारवाई झाली नाही, तर आपण पुन्हा उपोषण करु असा इशारा या महिलेने दिला आहे.
प्रकरण काय?
पीडित नर्सला लग्नाचे आमिष दाखवून गावातीलच वाळू माफिया असल्याचा आरोप असलेल्या तरुणाने लैंगिक शोषण केले असा आरोप तिने केला आहे. त्यानंतर त्या तरुणाच्या मामाने त्याचं दुसऱ्या मुलीसी लग्न लावून दिले. पण त्यानंतरही तो तरुण दारू पिऊन पीडित नर्स राहत असलेल्या रुमवर येऊन तिच्यावर अत्याचार करत राहिला, असा तिचा आरोप आहे. याच सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आवाज उठवला. मात्र तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी केला, आहे असा आरोप त्या नर्सने केला आहे. सहा वर्ष तिचे प्रेमसंबंध होते मग आता कशाला तक्रार करते, असे असं म्हणत तिला हीन वागणूक देत अर्वाच्च भाषा देखील वापरल्याचा आरोप या पीडित नर्सने केला आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक ठोंबरे, पीएसआय मीना तुपे आणि कर्मचारी मेखले यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी या पीडितेने केली आहे. या पोलिसांचे निलंबन झाले नाही तर वंचित बहुजन आघाडी पुन्हा आमरण उपोषण सुरू करेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी दिला आहे.
"बीड जिल्ह्यात चाललंय काय? कुठं चिमुकलीवर अत्याचार होतोय....तर कुठं गुंगीचं औषध देऊन बलात्कार केला जातो..तर कुठं शरीरसुखाची मागणी करुन महिलेला मारहाण केली जाते. एवढं होऊनही न्यायाची मागणी घेऊन पोलीस ठाण्यात हीन वागणूक मिळते... ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. जे सरकार छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलं, त्या सरकारच्या काळातच अशा दुर्दैवी घटना घडत असतील, तर हे खूप वाईट आहे. याची नैतिक जबाबदारी म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा" अशी मागणी देखील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केले आहे
कोरोना काळात रुग्णांची सेवा करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात येतोय, तर दुसरीकडे मात्र कोविड काळात अत्याचार झालेली नर्स आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणा-या या पीडित नर्सवर गेवराईतल्या तरुणाने अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडित मुलगी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी तिचं ऐकून न घेता आरोपीला पाठबळ दिल्याचा आरोप तिने केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक झाली असली तरी यातील आरोपीचं समर्थन करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या पीडित मुलीसह वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात येत आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी गंभीर आऱोप केले आहेत. "पीडित मुलगी दलित समाजाची आहे. तर आरोपी सवर्ण समाजातील आङे. 6 वर्ष त्यांचे प्रेमसंबंध होते. पण त्यानंतर जात आडवी आली आणि त्या तरुणाने या मुलीशी लग्नाला नकार दिला. ही मुलगी अल्पवयीन असल्यापासून आरोपीने तिचे शोषण केले. हा गंभीर गुन्हा आहे. त्यानंतर ही मुलगी कोरोनोच्या काळात नर्स म्हणून काम करु लागली. मग या तरुणाने तिला पुन्हा त्रास देण्यास सुरूवात केली. यामुळे घाबरलेल्या या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. तर पोलिसांनी तिला 4 दिवस फिरवले पण गुन्हा दाखल करुन घेतला नाही. उलट आरोपीलाच अभय देण्याचे काम पोलिसांनी केले. त्यामुळे या पोलिसांना बडतर्फ केले पाहिजे. तसेच या पोलिसांवर एट्रॉसिटी एक्टनुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही पोलीस आय़ुक्त, महिला आयोगा आणि गरज पडली तर थेट कोर्टातही जाऊ," असा इशारा मनिषा तोकले यांनी दिला आहे.
आता पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेतली. पीडित तरुणीला कारवाईचे आश्वासन दिले आहे. पण आता पुढील तीन दिवसात काय कारवाई होते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण एक तरुणी आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार द्यायला जाते आणि पोलीस तिलाच त्रास देतात असा आऱोप होत असेल तर ते गंभीर आहे. राज्यात महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणि दोषींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी दिशा कायद्याची तयारी सरकारने केली आहे. याचे विधेयक देखील मांडले गेले आहे. पण अजून कायदा अस्तित्वात आलेला नाही. पण एकीकडे सरकार असे कडक कायदे करण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे ज्यांच्य़ा जीवावर कायदे राबवयाचे आहेत त्या पोलिसांवरच जर असे गंभीर आरोप होत असतील तर सामान्यांनी काय करावे असा सवाल उपस्थित होतो आहे.