नागपूरमध्ये मृतदेहावर बलात्कार, मेलेल्या मनाच्या जिवंतांची असंवेदनशीलता आणि Poverty Porn च्या हाकाट्या !
आपल्या पायाखाली जळू लागलं तरच आपण दखल घेतो, तो पर्यंत नाही तर "सब चंगा हैं जी!"...त्यात काही वेळा आपल्यालाही भोवणारा उशीरही झालेला असतो...
X
कुणी स्वत:चा एखादा फोटो टाकला...माझ्यासारख्यानंही...तरी शेकडो लाईक येतात, पण सामाजिक गंभीर विषय पोस्ट केला, जागं करण्याचा प्रयत्न केला तरी एका मोठ्या वर्गाला दखल घ्यावीशी वाटत नाही.
आता #Necrophiliaचे पाहा. मृतदेहासोबत लैंगिक संबंध हा बलात्कारच ! पण कायद्यात तरतूद नसल्यानं शिक्षा नाही ! सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटकातील प्रकरणात निकाल दिला. आठवडाही उलटला नाही, तोच आता नागपूर इथं तरुणीची हत्या करून एका विकृत सैतानानं तिच्या शवावर बलात्कार केला. हत्येचा गुन्हा नोंदवला गेला असेल, पण बलात्काराचं काय ? नव्या BNS मध्ये काही नाही !
हे मांडूनही चर्चेचे विषय होत नाहीत. हा विकृतीचा वखवखाट वेगवेगळ्या स्वरूपात वाढतोय. कोणतंही क्षेत्र अपवाद नाही. शवासोबत लैंगिक संबंध हे जिवंत व्यक्तीशी केलेल्या बलात्कारासारखेच ! जिवंत व्यक्तीशी मंजुरीविना लैंगिक संबंध ठेवणं हा जसा गुन्हा, तसाच मंजुरी - नामंजुरीच्या पलीकडे गेलेल्या शवासोबतही असावंच ! निष्प्राण कलेवरासोबतचे असे संबंध ही विटंबनाच ! हा कायद्याचा, सरकारचा आणि आपलाही नालायकपणा ! शवात काय जीव नसतो, कसं रोखणार ? पण आपण त्यांच्या अधिकाराचं रक्षण करू न शकणारे नालायकच ! पुन्हा अशा विषयांना दुर्लक्ष करून मारायचं ही वेगळी मानसिकता! सगळ्यांमध्येच, सर्व क्षेत्रात बोकाळलेली...विकृतीची वाळवी !
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एक्सवर, फेबूवर पोस्ट करत महाराष्ट्रातील खासदार असणाऱ्या राजकीय नेत्यांना कायदा करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं. काहीच दखल नाही. आता आपल्या नागपूरमध्ये घडलंय. आता तरी जागे व्हा ! अशा विषयांना समाज असो की समाजमाध्यमं की राजकीय नेते प्रतिसाद मिळेलच असं नसतं. तरीही प्रयत्न करायचेच !
असं करणं ही असंवेदनशीलताच असं नाही म्हणणार, पण 'सब चंगा है जी' मानसिकता सत्ताधारी, त्यांचे अंधभक्त, विरोधक, त्यांचे अंधभाट यांच्यातच नाही तर संवेदनशीलतेची अपेक्षा असणाऱ्यांमध्येही बोकाळताना दिसतेय. त्यातून मग कुणी खुपणारं सामाजिक, आर्थिक वास्तव मांडत असलं, ते कितीही खुपणारं विदारक असलं की त्याला poverty porn विकतोय, दारिद्र्याचं, दु:खाचं भांडवल करतोय, असं हीनवणंही काही संवेदनशील वाटणाऱ्यांकडून सुरु होतं. काहीजण दारिद्र्याचं भांडवल करत असतीलही, पण त्यातून विदारक वास्तव मांडणाऱ्या सर्वांनाच, विशेषत: नव्या तरुणांना नाउमेद नसतं करायचं !
मुळात porn हे हातोहात खपतं, ९० काय ९५ टक्के लपतछपत का होईना पाहतात, इंटरनेटचं अर्थकारण त्यावरच चालतं, असं म्हटलं जातं! पण खरंच दु:ख, दारिद्र्याचं आता तसं राहिलंय ? आपल्यातील अनेक समाजमन घडवणारे नेते, अनेक माध्यमसम्राट, अनेक साहित्यिक, आमच्यातील अनेक संपादक, पत्रकार, अनेक कलाकार यांनी तसं राहू दिलंय? तसं असतं तर बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, परीक्षा घोटाळे, विद्यार्थी आत्महत्यांचा कोटा पॅटर्न हे राष्ट्रीय ट्रेंडिंग विषय झाले असते, निवडणुकीचे मुद्दे ठरले असते ! पण झगमगाट, लखलखाट यातच समाजमन हरवून टाकायचं, डोळे दिपले की मागच्या अंधारात वाट्टेल ते करता येतं, हाच नवा प्रस्थापित पॅटर्न तयार केला गेलाय, वाढवला जातोय ! फक्त राजकीय प्रस्थापित नाही, तर सर्वच क्षेत्रातील प्रस्थापित किंवा होऊ पाहणारे किंवा त्यांचं अंधानुकरण करणारे सर्वच तसं करत आहेत, करू पाहत आहेत. त्यामुळे मुळातच poverty porn तर नाही, पण भ्रामकता विकणारं illusion porn बोकाळतंय असंच वास्तव आहे !
या परिस्थितीत घडतं काय ? आपण illusionमध्ये भ्रामक अशा वास्तवात रमतो. वास्तवाकडे डोळेझाक करतो. त्यानं काही ती समस्या संपणार नसते, होतं एवढंच की ती अधिकच वाढते. मग अती काही झालं, आपल्या पायाखाली जळू लागलं तरच आपण दखल घेतो, तो पर्यंत नाही तर "सब चंगा हैं जी!"...त्यात काही वेळा आपल्यालाही भोवणारा उशीरही झालेला असतो...
तुळशीदास भोईटे, ज्येष्ठ पत्रकार