भारताच्या राजनैतिक भूमीत विवेकाचे बी रुजवणारे नाटक “राजगति”
X
भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महात्मा गांधींच्या विचारांची महत्वाची भुमिका होती. त्यांच्या विचारांनी देशातील जनतेची मानसिकता बदलली आणि स्वातंत्र्य लढ्याला प्राण दिला. गांधीजींच्या दृष्टीकोनानुसार, स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी देशातील प्रत्येक व्यक्तीला जागृत करणे आवश्यक होते.गांधीजींच्या मते, "स्वातंत्र्य" हा विषय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश असायला हवा.
आज किती सहज म्हटलं जातं की गांधींनी देशाचा सत्यानाश केला पण सत्याग्रहाचा खरा अर्थ जगणारे म्हणजे गांधीजी.. राजनीतीला नावं ठेवणं, घाण म्हणणं, राजनैतिक व्यक्तिमत्त्वांच्या चुका काढणं खूप सोप्पं आहे. खरंतर आपल्या भूमिकेपासून ही पळवाट आहे. ज्या ज्या वेळी देशातील लोकं राजनैतिक प्रक्रियेत सक्रिय सहभाग न दाखवता, संपूर्ण धुरा देशाच्या सत्तेवर असलेल्या सेवकांना सोपावतात आणि केवळ बघ्याची भूमिका स्वीकारतात त्या-त्या वेळी देश रसातळाला जाणे निश्चित आहे. सध्याचे राजकीय परिदृश्य एक विकारी प्रवृत्ती प्रतिबिंबित करते. समग्र राजनैतिक चिंतनाला, प्रक्रियेला न पाहता केवळ एका विशिष्ट रंगापुरते, विशिष्ट वर्गापुरते, विशिष्ट समूहापुरते स्वतःला सीमित करणे एखाद्या राजकीय पक्षाला विजयी करू शकते पण देश आणि लोकशाहीला पराजित करते. मुळात राजनीति ही व्यक्तिगत स्वार्थासाठी सत्ता गाजवणे नाही तर लोकशाहीला आत्मबळाने सुदृढ करण्याची प्रक्रिया आहे.
देशाची जनता हा देशाचा मूळ प्राण आहे, ओळख आहे, श्वास आहे ज्याची आपल्या भारतीय संविधानात नोंद ही आहे. "आम्ही भारताचे लोक" म्हणजेच "आम्ही भारताचे मालक" याची जनतेला सतत जाणीव करून देणे आवश्यक आहे. ही जाणीव महात्मा गांधींनी करून दिली. भारताचे स्वातंत्र्य आंदोलन हे केवळ एक राजकीय घडामोड नाही तर भारताच्या प्रत्येक नागरिकांमध्ये राजनैतिक चेतना अंकुरीत करण्याची प्रक्रिया होती. महात्मा गांधींचा संदेश विविधतेत एकता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांवर आधारित आहे, जो सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने मानवतेची मुक्ती साधतो. त्यांच्या दृष्टिकोनानुसार सत्ता स्थापन करणे आणि तिला शोषणाचे माध्यम बनवणे हे केवळ एक मिथक आहे. गांधीजींनी राजनीतीला जनकल्याणाच्या स्वरूपात प्रस्थापित केले ज्यामुळे लोकशाहीचे आणि मानवी हक्कांचे महत्व अधिक प्रगाढ झाले.
महात्मा गांधी हे सत्य, शांती, न्याय, अहिंसा, द्वेषविरहित भावना आणि संपूर्ण जगासाठी विचारांच्या समन्वयाचे व्यक्तिमत्त्व आहे, जे संपूर्ण जगासाठी शाश्वत स्वातंत्र्याचे आणि मानव उन्मुक्तेचे तत्त्वज्ञान आहे. आजच्या काळात गांधीजींचा राजनैतिक विवेक महत्त्वाचा आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिकात राजनीतिक चेतना जागवणे व त्याला दिशा देणे अनिवार्य आहे.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित "राजगति" हे नाटक याच राजनैतिक चेतनेला जागवते. राजनीति शुद्ध, सात्विक आणि पवित्र नीती आहे, जनकल्याणाचा मार्ग आहे हे दर्शवते. पंडित जवाहरलाल नेहरूंचे सार्वभौमत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या दोन्हींनी भारताला एक मजबूत आणि समृद्ध राष्ट्र म्हणून जगात प्रतिष्ठा मिळवून दिली.
"राजगति" हे नाटक राजनैतिक प्रक्रियेचे विवेचन करते आणि समग्र राजनैतिक चेतनेशी व्यक्तीला जोडते. लेखकाच्या संवादामध्ये दडलेल्या राजनैतिक घटना उलगडत दर्शक नाटकाच्या गाभ्यात प्रवेश करतात. प्रत्येक संवादामध्ये एक राजकीय घटना आहे, जी देश आणि जगात घडलेल्या मोठ्या बदलांचे प्रतिनिधित्व करते.
"थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी संवादाच्या पलीकडे जगतात. प्रत्येक संवाद, प्रत्येक क्रिया, आणि प्रत्येक शब्दात एक गूढता आहे, ज्याचा अर्थ आणि संदर्भ प्रेक्षकांच्या मेंदूत वैचारिक लाट निर्माण करते. हे नाटक प्रेक्षकांना राजनीतीच्या मुळाशी घेऊन जाते, जिथे प्रेक्षक आणि कलाकार दोघे प्रत्येक आयमांचे उत्खनन करतात.
लेखकाने "राजगति" नाटकात राजनैतिक परिदृश्य बदलण्यासाठी प्रेक्षकांसमोर चिंतनाचे चार महत्त्वाचे बिंदू मांडले आहेत:
१. सत्ता - सत्तेचा अहंकार आणि लोकांच्या जीवनावर होणारे परिणाम.
२. व्यवस्था - प्रशासनाच्या व्यवस्थापनाची भूमिका आणि जडत्वाचा प्रभाव.
3. राजनैतिक चरित्र - राजनैतिक व्यक्तिमत्वाची व्याख्या.
4. राजनीती - राजकारणाच्या सैद्धांतिक पैलूंचे मंथन
गांधीजींची शिकवण आपल्याला आठवण करून देते की खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्यातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकतेकडे वाटचाल करतो. आणि म्हणूनच २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्ताने "थिएटर ऑफ रेलेवन्स"चे प्रतिबद्ध रंगकर्मी "राजगति" नाटकाचा प्रयोग ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता गांधी तीर्थ, जळगाव येथे सादर करणार आहेत. सत्य, अहिंसा, शांती आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राजनीतिला मानवी उन्मुक्ततेचा प्रकाशस्तंभ म्हणून स्थापित करण्याचा हा पुढाकार आहे. कारण वैचारिक क्रांतीनेच आपल्याला स्वातंत्र्याची खरी जाणीव साधता येईल !
सायली पावसकर
रंगकर्मी