Home > News Update > मराठी भाषेचा गौरव धुमधडाक्यात साजरा करा, राज ठाकरेंचे पत्र

मराठी भाषेचा गौरव धुमधडाक्यात साजरा करा, राज ठाकरेंचे पत्र

मराठी भाषेचा गौरव धुमधडाक्यात साजरा करा, राज ठाकरेंचे पत्र
X

कुसूमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येतो. तर हा मराठी भाषा गौरव दिन सर्वप्रथम आपण सुरू केला आहे. त्याबरोबरच मराठी भाषा गौरव दिवस जोरदार आणि धुमधडाक्यात साजरा करा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्रातून कार्यकर्त्यांना केले आहे.

राज ठाकरे यांनी पत्रात लिहीले आहे की, 27 फेब्रुवारी हा मराठीतील थोर कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस. हा दिवस आपण महाराष्ट्रात "मराठी भाषा गौरव दिवस" म्हणून साजरा करत असतो. "गौरव दिवस" पुर्वीही दिनदर्शिकेत किंवा कॅलेंडरमध्ये होता. परंतू तो दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याची पधअधत आपण व आपल्या पक्षांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू केली.

राज ठाकरे यांनी पुढे लिहीले आहे की, हा आपल्या भाषेचा गौरव दिवस आहे. तो त्यात जोशात, त्याच दिमाखात आपल्या शहरात, गावात, प्रत्येक भागात, प्रभागात, प्रत्येक विभागात जोरात साजरा व्हायला हवा.

आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या भाषेचा गौरव त्याच जोरकसपणे साजरा झाला पाहिजे. लक्षात ठेवा की, मराठी भाषिकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर एकेकाळी आपलं राज्य प्रस्थापित केले होते. ह्या भाषेचा वचक संपुरअण देशात होता. ज्या भाषेनं कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले. त्या भाषेचा गौरव दिवस आहे हा. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसं, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतीकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागं ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावं घ्यायची? पण, ह्या सर्वा-सर्वांची भाषा मराठी आणि अर्थात सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचीही भाषा मराठीच !

अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमानं, त्याच उत्तुंगतेनं व्हायला हवा, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

ह्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. ते इतक्या जोरदारपणे साजरे करा की, तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळाले पाहिजे की, आज "मराठी भाषा गौरव दिवस" आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील ते पहा. तो जेव्हढा भव्य करता येईल, तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा, असे आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

संपुर्ण राज्यात ह्या दिवसाच्या निमित्ताने मराठीमय वातावरण तयार करा. तुम्हा सर्वांना शुभेच्छा! असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

Updated : 20 Feb 2022 12:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top