खोटं बोलणाऱ्यांना उघडं पाडण्यासाठीच माझ्या सभा - राज ठाकरे
Max Maharashtra | 17 April 2019 10:40 PM IST
X
X
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सातारा इथं जाहीर सभा झाली या सभेत राज यांनी पुन्हा एकदा मोदी-शहा यांच्यावर जोरदार टीका केलीय. राज यांनी आपल्या भाषणात ज्या महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातलाय ते मुद्दे ...
- नरेंद्र मोदी आणि अमित शाह ह्यांच्याविरोधात देशात फारसं कोणी बोलत नसताना मीच कसा काय बोलतोय असं मला विचारलं जातं, ह्याचं उत्तर आहे माझे प्रेरणास्थान आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज
- छत्रपती शिवाजी महाराजांशी लढाई करण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्राकडे कूच करायला निघाला, पण दरम्यानचा काळात महाराजांचं निधन झालं होतं. असं असताना सुद्धा औरंगजेब महाराष्ट्रात ठाण मांडून बसला कारण औरंजेबाला 'शिवाजी' हा शब्द-विचार छळत होता
- मोगलांच्या विरोधात पहिला आवाज उठवणारा महाराष्ट्र होता, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारा पहिला आवाज महाराष्ट्र होता, मग मोदी आणि शाह ह्यांच्याविरोधात आवाज उठवायला महाराष्ट्र का पुढे नसेल?
- राजा रामदेवराय ह्या आमच्या राजाच्या मृत्यूनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत महाराष्ट्र अंधारात होता कारण महाराष्ट्र बेसावध राहिला आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करतोय की बेसावध राहू नका. मोदी आणि शाह तुमचं जगणं हराम करू शकतात.
- पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ज्या विषयांवर बोलले होते त्या विषयांवर ते आज बोलायला तयार नाहीत. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत.
- पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी ज्या ज्या विषयांवर बोलले होते त्या विषयांवर ते आज बोलायला तयार नाहीत. नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातले एकमेव पंतप्रधान जे गेल्या ५ वर्षात एकदाही पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला तयार नाहीत
- रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पासून ते मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मोदींनी ह्या देशावर नोटबंदी लादली. असं काय होतं की ह्या सगळ्यांना तुम्हाला विश्वासात घ्यायचं नव्हतं? बरं मोदींनी नोटबंदींनी काय साधलं?
- नोटबंदीने ४ ते ५ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काळा पैसा होता तसाच आहे. फक्त भाजपचं सेव्हन स्टार कार्यालय दिल्लीत उभं राहिलं आणि निवडणुका जिंकायला पैसे आले हेच साध्य झालं नोटबंदीने
- ४ वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली निवडणुकीच्या वेळेला मी बोललो होतो की नरेंद्र मोदी हे निवडणूक जिंकण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील आणि तसंच झालं
- आज सैन्यातील जवान अत्यंत कठीण परिस्थितीत देशांच्या सीमांचं रक्षण करत असतात, आणि आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद जवनांचा वापर राजकीय फायद्यासाठी करून घेतात. लाज नाही वाटत पंतप्रधानांना?पंतप्रधान होण्याआधी मोदी, तेव्हाच्या पंतप्रधानांना विचारायचे तुमच्या हातात सगळी सत्ता आहे मग तरीही सीमांच्या आडून शस्त्र, अतिरेकी येतात कुठून आणि कसं? मग मला सांगा नरेंद्र मोदी तुमच्या हातात पूर्ण सत्ता होती ना मग पुलवामा हल्ला झालाच कसा? ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही कधी देणार?
- मोदी सत्तेत आल्यावर जेवढे सैनिक शहीद झालेत तेव्हढे सैनिक ह्याच्या आधी कधी झाले नव्हते. पाकिस्तानला जशास तसं उत्तर देऊ असं सत्तेत येणाच्या आधी म्हणणारे मोदी, स्वतःच्या शपथविधीला नवाझ शरीफना बोलवतात, त्यांना केक भरवतात. मला सांगा शहीद जवानांच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल?
- आपले सैनिक काश्मीरमध्ये चेकपोस्टवरती प्रामाणिकपणे त्यांचं कर्तव्य बजावत असताना, कोणीतरी ३,३ चेकपोस्ट तोडून घुसणाऱ्याला नाईलाजाने गोळी मारली. पुढे काश्मीर पेटलं आणि अशा वेळेला सैन्याच्या नावावर राजकरण करणाऱ्या मोदींनी सैनिकांना माफी मागायला लावली आणि त्यांच्यावर केसेस टाकल्या
- जर सैनिकांवर अशा प्रकारे कारवाई होणार असेल तर जवानांच्या मनोधैर्याचं काय झालं असेल असं विचार करा? आणि पुढे त्या काश्मीर मध्ये जवानांवर लोकांनी हल्ले केले आणि जवान का शांत बसले कारण त्यांना माहित आहे की आमचं सरकार आमच्या पाठी ठाम उभं राहणार नाही
- भारतीय जनता पक्षाचा आमदार परिचारक हा जवानांच्या कुटुंबियांबद्दल गैरउदगार काढतो तरी भाजप कारवाई करत नाही, तो आमदार राहतो. आणि हाच परिचारक आजच्या नरेंद्र मोदींच्या अकलूजच्या सभेत उभा असतो. हेच मोदी म्हणाले होते की व्यापारी हा सैनिकांपेक्षा जास्त शूर असतो. ही जवानांबद्दलची आस्था
- पाकिस्तनाचा पंतप्रधान इम्रान खान का सांगतोय की नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हायला पाहिजेत. असं का? आजपर्यंत हे कधी घडलं नाही? काय शिजतंय नक्की?
- १५ एप्रिलला राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदी म्हणाले की शेतकरी आत्महत्या हा जर निवडणुकांचा मुद्दा होऊ शकतो तर शहीद जवान का होऊ शकत नाही? ह्यावरून आता असं वाटतंय की पुलवामा ठरवून घडवलं गेलं का? आपले ४० जवान हकनाक मारले गेले.
- १४ फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात ४० जवान हकनाक मारले गेल्यावर खरं तर पंतप्रधानांना दुःख असायला हवं की नाही? पण टेलिग्राफ नावाच्या वर्तमानपत्राने एक फोटो छापलेत ज्यात मोदी डिझायनर कपड्यात हसत फिरत होते. आणि एवढं घडलेलं असताना कोरिया मध्ये अवॉर्ड घ्यायला गेले.
- नोटबंदीनंतर देखील मोदी निर्लाज्जासारखे पुरस्कार स्वीकारायला जपानला निघून गेले जेंव्हा देशात लोकं रांगेत उभे राहत होते, शेकडो माणसांचे जीव गेले
- शहीद जवानांच्या जीवावर लोकांकडे मोदी मागत आहेत, ऐअरस्ट्राईक करणाऱ्या पायलट्सच्या जीवावर मतं मागत आहेत पण ५ वर्षांपूर्वी जे बोलले त्यावर काही बोलत नाहीत. म्हणून सांगतो मोदी आणि शाह ह्यांना राजकीय क्षितिजावरून हटवुयाच पण त्यांना मदत होईल अशा कोणालाही मतदान करू नका.
- माझं देशाला आवाहन आहे, बेसावध राहू नका. देशात लोकशाही टिकणार का हुकूमशाही येणार हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे विसरू नका हेच माझं तुम्हाला आवाहन आहे.
Updated : 17 April 2019 10:40 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire