डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण, सनातनच्या ५ जणांवर आरोप निश्चित होणार
X
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सनातन संस्थेच्या ५ जणांवर आरोप निश्चित करण्याचे आदेश पुण्याच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १५ सप्टेंबरला होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी या आरोपींवर दोषारोप पत्र निश्चित केले जाणार आहे, असे कोर्टाने सांगितले आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये पुणे पोलिसांकडून हे प्रकरण CBI कडे वर्ग करण्यात आले होते. CBIने आतापर्यंत ५ आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या विशेष कोर्टात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
सनातनच्या ५ जणांविरुद्ध दोषारोप
या प्रकरणात वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि विक्रम भावे या चार आरोपींविरोधात हत्या, हत्येचा कट आणि UAPA तसेच शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दोषारोप निश्चित केले जाणार आहेत.
संजीव पुनाळेकरही अडचणीत
एवढेच नाही तर वकील संजीव पुनाळेकर यांच्यावरही पुरावे नष्ट करण्याचा आरोप निश्चित केला जाणार आहे, असेही कोर्टाने स्पष्ट केल आहे.
सीबीआयने न्यायालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 2013 च्या खून प्रकरणात आरोपींविरोधात युएपीए अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली होती. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी याआधी शुक्रवारी 3 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी सीबीआयच्या वतीने युक्तिवाद करताना आरोपींवर कलम 120 ब (गुन्हेगारी कट), 302 (खून), शस्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली आणि यूएपीए च्या कलम 16 (दहशतवादाच्या कृत्यांसाठी शिक्षा) अंतर्गत खटला चालवण्याची मागणी केली होती.
दरम्यान सरकारी वकिलाने यावेळी यूएपीएचे कलम 16 लागू करण्यासाठी राज्य सरकारकडून सीबीआयला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली. मात्र, बचाव पक्षाचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी UAPA चे कलम 16 लागू करण्याच्या फिर्यादीच्या मागणीला विरोध केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी 7 सप्टेंबरची तारीख दिली होती.
आतापर्यंत काय कारवाई झाली?
या प्रकरणात, सीबीआयने 2016 मध्ये सनातन संस्थेचे सदस्य डॉ. वीरेंद्र तावडे,याला मुख्य सूत्रधार असल्याच्या संशयाखाली अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये दाभोलकरांवर कथितपणे गोळीबार करणाऱ्या शरद कळसकर आणि सचिन प्रकाशराव अंदुरे या दोघांना अटक करण्यात आली. मे 2019 मध्ये सनातन संस्थेचे वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचे सहकारी विक्रम भावे यांना मुंबईत अटक करण्यात आली. या पाच जणांविरुद्धच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील संजीव पुनाळेकर सध्या जामिनावर बाहेर असून इतर चार जण तुरुंगात आहेत. सीबीआयने अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा या तिघांना अटक केली आहे. जे 2017 मध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचे आरोपी आहेत. या तिघांविरुद्ध आजपर्यंत आरोपपत्र दाखल झालेले नाही.