छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं
X
मुंबई : कर्नाटकच्या बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. वर्धा येथे अखिल भारतीय मराठा महासंघांच्यावतीने निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. शिवप्रेमींनी वर्धेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करत घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवला.
तर , सांगलीत राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत, विटंबना करणार्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली. तिकडे अंबरनाथमध्येही राष्ट्रवादीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्ध अभिषेक करत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.यावेळी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक सरकार विरोधात घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने अंबरनाथ मधील शिवाजी चौकात निषेध व्यक्त केला.
कल्याणमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाराजांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी घटनेचा निषेध करत ,भाजपचा मुख्यमंत्री असलेल्या या राज्यात भाजपने विष पेरण्याचे काम केले,या विषवल्लीचा निषेध अशा शब्दात भाजपवर टीकास्त्र सोडले.
मुलुंड रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी मुलुंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आला. यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.