मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार
मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय, मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
X
मुंबई // मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय, मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याची सरकारची भूमिका आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.
मुंबई महापालिका कायद्यात सुधारणा करणारे विधेयक संमत करण्यात आले. दरम्यान यावेळी शिंदे यांनी म्हटले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी सरकारने पालिकेचा करवाढीचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे पालिकेला वर्षांला एक हजार कोटींचा फटका बसणार आहे. त्याचबरोबर ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याबाबत पालिकेने पाठविलेल्या प्रस्तावाशी सरकार सहमत आहे. पण, केवळ सामान्य करात सूट न देता मालमत्ता व त्याअनुषंगाने लावण्यात येणाऱ्या सेवाशुल्कासह हा संपूर्ण कर माफ करण्यात येणार आहे. त्याबाबत योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही नगरविकास मंत्री यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढविण्याच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा सरकारने राजकीय हेतूने आणल्याचा आरोप केला. भाजपचे नगरसेवक असलेल्या ४४ प्रभागांमध्ये रचना बदलण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाला पाठविला होता. पण, भाजपने आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोग सावध झाला. त्यामुळे प्रभाग पुनर्रचना करण्यासाठी अन्य कोणताच पर्याय नसल्याने सरकारने नऊ प्रभाव वाढविण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.