Home > News Update > असा पंतप्रधान होणे नाहीं...

असा पंतप्रधान होणे नाहीं...

असा पंतप्रधान होणे नाहीं...
X

आधुनिक भारताला सुखाचे दिवस दाखवणारा अर्थतज्ञ पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग हे ओळखले जातात.

१९९१ मध्ये बिघडलेल्या भारतीय अर्थकारणाला गती देऊन देशाला प्रगतीचा मार्ग दाखवणारे विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांनी देशावर अफाट उपकार करून ठेवले आहेत. २००४-०५ मध्ये जेव्हा ‘‘इंडिया शायनिंग’’चा फुगा फुटला होता, तेव्हा देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपी फक्त सात टक्के होते. डॉ. सिंग यांच्या कल्पक नेतृत्वाखाली देशाने पहिल्याच वर्षात भरारी घेतली. २००५-०६ मध्ये जीडीपी ९.५ टक्क्यांवर गेला. अगदी २०१०-११ पर्यंत जीडीपी ९.३ टक्क्यांपर्यंत स्थिरावला होता. कल्याणकारी योजनांचा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारी पातळीवर खुप चांगले प्रयत्न झाले, म्हणून कोट्यवधी भारतीय दारिद्र्य रेषेखालून वर आलेले दिसले.

पण त्या नंतरच्या दोन वर्षातील आर्थिक चढउतारामुळे डॉ. सिंग यांची प्रशासनावरील पकड ढिली झाली आणि त्याच्या जोडीला कोटय़वधी लोकांना मनरेगा आणि अन्न सुरक्षा योजनेसारख्या जनहितकारी, परंतु खर्चिक योजनांमुळे शासनाच्या तिजोरीवर बोजा पडत गेला. त्याहून महत्त्वाचे, ज्या काळात डॉ. मनमोहन सिंग देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम करत होते. तेव्हा अनेक बडे काँग्रेस नेते भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले होते. परिणामी २०१२ ते २०१४ या दोन वर्षाच्या काळात अनेक स्कॅम्स आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडली. त्याच सुमारास नव्याने तरुण होत असलेल्या तरुणांच्या देशाच्या अपेक्षा वेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ लागल्या होत्या. निर्भया प्रकरणानंतर पेटलेले वातावरण लोकपाल आंदोलनाने पार टोकाला नेऊन ठेवले होते.

९ टप्प्यांत पार पडलेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुक निकालात, नरेंद्र मोदी यांच्या विजयाने या तरुणाईच्या अपेक्षांचे नवे दर्शन घडले... परिणामी या सा-या राजकीय जोशात आणि जल्लोषात पंतप्रधान डॉ. सिंग हे नाव मागे पडलेले दिसले... अगदी काँग्रेसी नेते, कार्यकर्तेही त्यांना विसरले. त्याहून खेदाची गोष्ट म्हणजे, फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरील बाष्कळ आणि बालिश चर्चेत डॉ. सिंग यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका होताना दिसली... ज्याचा कुणी प्रतिवाद केला नाही... पण स्थितप्रज्ञ योगी जसा वागेल, तसे डॉ. मनमोहन सिंग वागले आणि पुढील काळात जगले.

आमच्या पिढीला सुखाचे दिवस दाखवणारा हा खऱ्या अर्थानं "फिलॉसॉफर किंग" आज आपल्यातून निघून गेला आहे.

पण त्यांचे योगदान भारतीय इतिहासात अमर राहील.

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह

यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

- महेश म्हात्रे

संपादक, महाराष्ट्र रिसर्च सेंटर.

साभार - महेश म्हात्रे यांच्या फेसबुक वॉलवरून

https://www.facebook.com/share/p/1AGSDM9z5C/

Updated : 27 Dec 2024 6:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top