न्याय संस्थेवर दबाव; चंद्रचूड यांना २१ माजी न्यायाधिशांनी चिंता व्यक्त करत लिहिले पत्र...!
X
न्याय संस्थेवर वाढत असलेल्या दबावाबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून न्यायसंस्थेवर चूकीचा दबाव वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. राजकीय लाभ आणि वैयक्तिक हितापोटी न्याय प्रणालीत जनतेचा विश्वास संपवला जात असल्याचेही या पत्रातून कळविण्यात आले आहे.
दरम्यान, पत्रात न्यायाधिशांनी असं म्हटलंय की, काही गट या न्यायसंस्थेला कमकुवत बनवण्याची योजना तयार करत आहेत. या न्यायसंस्थेत आमच्या आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या सेवेनंतर आणि अनुभवाच्या जोरावर याबाबत चिंता व्यक्त करत आहोत. राजकीय हितासाठी आणि आपल्या वैयक्तिक लाभापोटी काही गटांकडून न्यायसंस्थेत जनतेच्या विश्वासाला आळा घालण्याचा प्रयत्न केला जातोय. याच्या पध्दती संभ्रम निर्माण करणाऱ्या आहेत. न्यायाधिशांच्या आणि न्यायालयाच्या सत्यनिष्ठेवर आरोप करून न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा उघड प्रयत्न केला जात आहे.
तसेच, ना केवळ न्यायसंस्थेत असलेल्या पावित्र्याचा अपमान होतोय, तर न्यायाधिशांच्या निष्पक्षतेच्या सिध्दांतालाही आव्हान केलं जात आहे. या गटाकडून वापरण्यात येणाऱ्या पध्दती न्यायसंस्थेची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यांच्याकडून बिनबूडाच्या थेअरी तयार केल्या जात असून यामाध्यमातून न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांना लिहिलेल्या पत्रावर २१ माजी न्यायमूर्तींनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. न्यायमू्र्तींनी यात असं म्हटलं आहे की, न्यायसंस्थेचे महत्व आणि निष्पक्षता वाटवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. या न्यायसंस्थेला अबाधित ठेवण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून उभा आहोत. आम्हाला अपेक्षा आहे की, अशा आव्हानात्मक स्थितीत न्याय आणि समतेचा स्तंभ म्हणून तुमचं नेतृत्व आणि मार्गदर्शन न्यायसंस्थेचं संरक्षण करेल.