महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येण्याचे टाळा, प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
X
Omicron विषाणूच्या धोक्यामुळे राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये असे आवाहन केले आहे. याला काही आंबेडकरी संघटनांनी विरोध केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जाता येत नाहीये, आता सरकारने सर्व व्यवहार सुरू केले असताना केवळ चैत्यभूमीवरच निर्बंघ का असा सवाल या संघटनांनी उपस्थित केला आहे. पण आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
"६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावे की नाही अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या variant बद्दल कोणालाही अंदाज येत नाहीये, अशा परिस्थितीत आपण येणं टाळावं असं माझं आवाहन आहे." असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. "आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच, आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया" असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.