राम शिंदे-रोहित पवार यांचे संत गोदड महाराज मंदिरासमोरच डाव-प्रतिडाव
X
अहमदनगर : राज्यात जवळपास 105 नगर पंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, अनेक ठिकाणी काल उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवस होता. या दिवशी अनेक ठिकाणी डाव-प्रतिडावात टाकत रंजक राजकारण रंगळ्याचे पाहायला मिळाले. यातून अनेक ठिकाणी राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले.
अहमदनगर जिल्ह्यात कर्जत, पारनेर, शिर्डी आणि अकोले नगर पंचायतींच्या निवडणुका होत असून या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात हीच परस्थिती पाहायला मिळाली आहे, मात्र यात कर्जतमध्ये मोठे राजकीय नाट्य समोर आले असून भाजप-राष्ट्रवादी यानिमित्ताने अटी-तटिला आल्याचे दिसत आहे.
भाजपच्या दोन उमेदवारांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्याने हे राजकीय द्वंद्व सुरू झाले आहे. यात माजीमंत्री आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.रोहित पवार यांच्यावर प्रतिस्पर्धी उमेदवारांना दहशतीने उमेदवारी मागे घेण्यास भाग पडल्याचा गंभीर आरोप केला आहे, त्यांनी कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराजांच्या मंदिराबाहेर मौनव्रत धरत आंदोलन सुरू केले आहे.
राम शिंदे यांच्या मौनव्रत आंदोलनाच्या सलग दुसरा दिवस असून या आंदोलनाची चर्चा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान आज राम शिंदे यांच्या उपस्थितीत काळ्या फिती लावून तहसील कार्यालयावर आज रॅली काढण्यात आली होती, यावेळी भाजप कार्यकर्ते रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले. रॅली नंतर शिंदे यांनी आपले मौन सोडले आणि आ.रोहित पवारांवर घणाघात केला.
एकीकडे राम शिंदे यांनी ग्रामदैवत संत गोदड महाराजांच्या मंदिराबाहेर मौनव्रत धारण करून ठिय्या दिलेला असताना आज आ.रोहित पवारांनी संत गोदड महाराज मंदिरात दर्शनाचे निमित्ताने भेट दिली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. आ.रोहित हे मंदिरामध्ये आले त्यांनी महाराजांचे दर्शन घेतले आणि काही वेळ मंदिरात बसून उपस्थित कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर काही वेळाने रोहित पवार त्याच दरवाज्याने बाहेर पडले ज्या ठिकाणी माजी मंत्री राम शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह मौनव्रत आंदोलन सुरू केले होते. यावेळी रोहित पवार यांनी आंदोलकांकडे बघितले देखील नाही. याबाबतिचे फोटो , व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
एकूणच कर्जत नगर पंचायत निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीने मोठी प्रतिष्ठेची केल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे. विशेष म्हणजे यासर्व घडामोडी शांततेत होत असल्या तरी आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहे. मात्र , यानिमित्ताने कर्जतचे ग्रामदैवत असलेले संत गोदड महाराज मंदिर पण चर्चेत आले आहे.