भाजप शासित राज्यातील खड्डे भाजपला दिसत नाही का? खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून शिवसेनेचा पलटवार
X
मुंबईतील रस्स्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून भाजपने शिवसेनाला चांगलेच धारेवर धरलं असून, भाजपच्या या आरोपांना आता शिवसेनेकडून देखील प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. मुंबईची भौगोलिक परिस्थिती वेगळी असून पावसाळ्यात खड्डयांचे प्रमाण वाढतं पण नागपूर, बंगलोर, बडोदा, उत्तर प्रदेश येथील रस्यांवरही खड्डे पडले आहेत. ते भाजपवाल्यांना का दिसत नाही? असा सवाल करत शिवसेनेच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी भाजपला सुनावलं आहे. मुंबईतील रस्स्यांवर खड्डे का पडतात? या विषियावर आयोजित केलेल्या मॅक्स महाराष्ट्रच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
रस्स्यावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या, तर दुसरीकडे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी खड्डे पडण्याला जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, बोकाळलेला भ्रष्टाचार याला कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. टेंडर काढताना अनेक वेळा गडबड केली जाते , आम्ही ते रोखण्याचं काम करतो पण सत्ताधारी शिवसेना पक्ष ऐकत नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
टेंडरमध्ये कमी दराने काम तर घेतलं जातं पण हे काम करताना दर्जा सांभाळला जात नाही त्याची दखल प्रशासन घेत नाही असंही ते म्हणाले. काही वर्षापूर्वी रस्ते कामात भ्रष्टाचार झाला होता, त्यावर समिती नेमली होती त्याचा अहवाल शिवसेना का बाहेर काढत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगळी यांनी महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदार मिळून महापालिकेच्या पैशाची लूट करतात पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने दर्जावर परिणाम होतो असं त्यांनी सांगितलं. प्रशासनाने या अधिका-यांना जबाबदार धरलं तर रस्त्यावरचे खड्डे कमी होतील असंही ते म्हणाले. मुंबईतील रस्स्यांवर खड्डे का होतात या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मॅक्स महाराष्ट्रवर प्रसारित झालेली कालची टू द पॉईंट चर्चा नक्की पहा