Home > News Update > #Farmerprotest : दिल्लीच्या सीमेवरील बॅरीकेड्स हटवण्यास सुरूवात

#Farmerprotest : दिल्लीच्या सीमेवरील बॅरीकेड्स हटवण्यास सुरूवात

#Farmerprotest :  दिल्लीच्या सीमेवरील बॅरीकेड्स हटवण्यास सुरूवात
X

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे. पण आता या ठिकाणी लावलेले बॅरिकेड्स हटवण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. गाझीपूर सीमेवर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत, त्याठिकाणचे बॅरिकेड्स शुक्रवारी पोलिसांनी हटवले. अशाचप्रकारे गुरूवारी रात्री टिकरी सीमेवरही कारवाई करण्यात आली आहे. गाझीपूर इथले बॅरिकेड्स हटवल्यानंतर इथून पुढच्या काही दिवसात वाहतूक सुरू होईल, अशी माहिती डीसीपी प्रियंका कश्यप यांनी दिल्याचे या वृत्तात सांगण्यात आले आहे.

पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून या सीमेवर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्य़ा तीन नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेत हे कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय बॅरिकेड्स हटवले गेले नसणार, तसेच शेतकऱ्यांशीही चर्चा करुन बॅरिकेड्स हटवून वाहतूक सुरू केली जाण्याची तयारी आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

गाझीपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वर सरकारने जे लोखंडी खिळे ठोकले होते, ते देखील काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मार्गात लोखंडी खिळे ठोकले होते. या ठिकाणी सीमेवर जेसीबी मशीनच्या सहाय्याने सिमेंटचे तसेच लोखंडी बॅरिकेड्स हटवण्याचे काम सुरू आहे.

शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे पण ते रस्ता अडवून ठेवू शकत नाहीत, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले होते. यानंतर काही दिवसांनी ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. नोएडा इथल्या रहिवासी मोनिका अग्रवाल यांनी शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्याने इथून वाहतुकीसाठी जाता येत नसल्याबाबत याचिका दाखल करत रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती. या याचिकेवरील सुनावणी सध्या सुरू आहे.

Updated : 29 Oct 2021 1:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top